Cyclone Mandos : चेन्नईच्या किनारपट्टीवर मंदोस चक्रीवादळची धडक, 'या' तीन राज्यात 'रेड अलर्ट', महाराष्ट्रातही परिणाम
Cyclone Mandos : मंदोस चक्रीवादळाचा (Mandos Cyclone) परिणाम विविध राज्यात दिसत आहे. तीन राज्यांमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Cyclone Mandos : सध्या वातावरणात बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरात मंदोस चक्रीवादळ (Mandos Cyclone) तयार झालं आहे. मंदोस चक्रीवादळ चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकलं आहे. त्यामुळं तिथं जोरदार वाऱ्यासह पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. तामिळनाडूसह इतर राज्यातही या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. आज तीन राज्यांमध्ये हवामान विभागानं (India Meteorological Department) पावसाचा 'रेड अलर्ट' (Red Alert) जारी केला आहे. तामिळनाडू, पद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यात हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच महाराष्ट्रासह गुजरातमध्येही पावसाचा अंदाज जारी केला आहे.
कर्नाटक, केरळ राज्यातील हवामानातही बदल
दक्षिण भारतावर मंदोस चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे. तामिळनाडू, पद्दुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. तिन्ही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अस्मानी संकटामुळे प्रशासन सतर्क झालं असून एनडीआरएफसह इतर पथके तैनात करण्यात आली आहेत. दक्षिण भारतामध्ये येणाऱ्या मंदोस चक्रीवादळाचा फटका शेजारी असणाऱ्या राज्यांना बसण्याची शक्यता आहे. कर्नाटक, केरळमधील हवामानात बदल झाला आहे. महाराष्ट्र, गुजरातमध्येही पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
17 जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी
चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, विलाप्पुरम, कुड्डालोर, रानीपेट, वेल्लोर, तिरुवल्लूरसह तामिळनाडूच्या 17 जिल्ह्यांमध्ये शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आयएमडीने रेड अलर्ट जारी केला आहे. IMD दिलेल्या अंदाजानुसार दक्षिण-पश्चिम आखातावर चक्रीवादळ सरकत आहे. त्यामुळं कावेरी डेल्टा प्रदेशातील नागापट्टिनम आणि तंजावर तसेच चेन्नई आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
12 ते 14 डिसेंबर राज्यात पावसाचा अंदाज
महाराष्ट्रात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात कालपासून किमान तापमानात साधारण चार तर कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा घसरण झाली आहे. त्यामुळं रात्री थंडी वाढली आहे. मुंबईसह कोकणात मात्र ही घसरण दोन्ही तापमानात सरासरीपेक्षा दोन डिग्रीने जाणवेल. थंडीचा हा परिणाम उद्यापर्यंत जाणवू शकतो. रविवारी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर सोमवारपासून म्हणजे (12 डिसेंबरपासून) चक्रीवादळ वातावरणाच्या परिणामामुळं तापमानात वाढ होईल. 12 ते 14 डिसेंबर यादरम्यान राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Cyclone News : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, तामिळनाडूत शाळांना सुट्टी, महाराष्ट्रात काय स्थिती?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
