Curfew In Maharashtra | कृषिविषयक सर्व वाहतूक सुरू राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करत असल्याचं जाहीर केलं. संचारबंदी असताना राज्यातील विविध जिल्ह्यामधील परिस्थिती कशी आहे, त्याचा आढावा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Mar 2020 06:27 PM
2. कृषिविषयक सर्व वाहतूक सुरू राहणार, जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱ्या वाहनांवर कंपनीचं नाव बंधनकारक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती, सहकार्याबद्दल केंद्र सरकारचे मानले आभार
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा सहकारी साखर कारखाना लॉकडाऊन नंतरही सुरूच आहे. राज्यात सर्वत्र जमावबंदी आणि संचार बंदी असताना टोपे यांच्या जालना जिल्ह्यातील अंकुशनगर येथील समर्थ सहकारी साखर कारखान्याचे गाळप सुरू आहे. दरम्यान या ठिकाणी शेकडो कामगार एकत्र येत असल्याने कोरोनाचा प्रदूर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यभरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कारखाने बंद असतानाआरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कारखाना मात्र सुरू आहे, दरम्यान जिल्ह्याजिल्ह्यातील सीमा बंद केल्या असताना कारखान्यावर बाहेरून येणाऱ्या ऊसाची देखील वाहतूक सुरूच आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र बुलडाण्यात संचारबंदीच्या काळात लोकांचा मुक्त संचार शहरात बघायला मिळाला आहे. शहरात जयस्तंभ चौक, इकबाल चौक, संगम चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विविध कारण सांगून बुलडाण्यात लोक फिरू लागल्याचे चित्र होतं. यावेळी पोलिसांनी दांडूचा प्रसाद देण्याची सुरुवात करताच शहरातील गर्दी कमी झाली. जीवनावश्‍यक वस्तू, औषधं, दुध, बेकरीच्या ठिकाणी सकाळी गर्दी पाहायला मिळाली.
नवी मुंबई : राज्यात संचारबंदी असतनाही काही महाभाग रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच काही जण मुंबईतून बाहेरही जात आहेत. अशाच मुंबई बाहेर पडणाऱ्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. यासाठी वाशी टोलनाक्यावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गाड्या अडवून पोलिसांकडून तपासणी सुरु आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर गाड्यांना पुढे जाण्यास मनाई करण्यात येत आहे. तसंच विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना नवी पोलिसांनी परत मुंबईत पाठवले आहे. हायवेवर सर्वत्र मोठा बंदोबस्त ठेवला आहे.
नागपूर : संचारबंदीमध्ये बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी सक्तीची कारवाई केली आहे. सीताबर्डी परिसरात विनाकारण फिरणाऱ्या अनेकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. विनंती करुनही लोक ऐकत नसल्याने पोलिसांना आता सक्ती करावी लागत आहे. त्याआधीही नागपूरच्या वरायटी चौक, लक्ष्मीबाई चौक आणि झीरो मोबाईल परिसरात बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी सकाळी उठबस करायची शिक्षा देत लगेच घरी पाठवले.
सिंधुदुर्ग : तळकोकणात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांच्या सीमा बंद केल्यानंतर, बांदा पत्रादेवी इथे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. सीमा बंद केल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या दोन ते तीन किमीपर्यंतच्या रांगा पाहायला मिळत आहेत.
बेळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली. यात मद्य दुकाने मध्यरात्रीपासून १ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र बंदी लागू होण्याआधीच तळीरामांनी वाईन शॉपसमोर रांगा लावल्या होत्या. मद्याच्या वाढत्या मागणीमुळे वाईन शॉपमधील शोकेस रिकामे झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. तळीरामांनी मद्याचा स्टॉक राहावा यासाठी बँकेत रांगा लावतात त्याप्रमाणे वाईन शॉपसमोर रांगा लावल्या होत्या.
सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कोरोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहे.संचारबंदी असूनही नागरिक घराबाहेर पडल असल्याने सांगली जिल्ह्यात सर्व पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द झाल्या असून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोनाबाधित चार जण आढळल्याने इस्लामपूर शहरात रात्रीपासून विशेष दक्षता घेण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड : पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही वाहनांची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. पीएमपीएमएलपासून अगदी सायकलपर्यंत प्रत्येक वाहनाचा यात समावेश करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवा पुरावणाऱ्या वाहन आणि व्यक्तींची तपासणी करुन वाहतुकीस परवानगी दिली जाईल. 24 मार्च म्हणजे आज पहाटे 5 ते 31मार्चच्या रात्री 12 पर्यंत ही अंमलबजावणी लागू असेल.

पार्श्वभूमी

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाईलाजास्तव मला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यात कोरोना विषाणू जास्त पसरू नये म्हणून जिल्ह्याजिल्ह्यातील सीमाही बंद करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. सोबतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरुच राहणार आहेत.

काय काय सुरु राहणार?




    • जीवनावश्यक वस्तूंची दुकानं





    • औषधांची दुकानं





    • किराणाची दुकानं





    • दूध आणि दुग्धजन्य पदार्थ





    • दवाखाने, रुग्णालयं





    • बँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था





    • वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा यांसारखी अत्यावश्यक कार्यालयं





    • रिक्षा, टॅक्सी सुरु (प्रवाशांची संख्या मर्यादित)





    • कृषीमालाशी सबंधित वाहतूक





    • रेल्वेतील मालवाहतूक




काय काय बंद राहणार?




    • नागरिकांचा प्रवास





    • मुंबईची लोकलसेवा





    • जिल्ह्यांच्या सीमा





    • राज्यातील सीमा





    • परदेशातून येणारी वाहतूक





    • धार्मिक प्रार्थना स्थळे





    • खासगी वाहने (अत्यावश्यक कारणांसाठी सुरू राहतील)





    • शाळा, महाविद्यालयं





    • मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह





    • जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळळता इतर दुकानं




यावरुनच अत्यावश्यक असणाऱ्या सेवा वगळता त्याव्यतिरिक्तच्या सर्व सेवा येत्या काळात बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

संबंधित बातम्या

Curfew in maharashtra | राज्यात संचारबंदी! काय सुरु राहणार आणि काय बंद?

coronavirus | सांगली जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे रूग्ण



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.