सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील काही भागात संचारबंदी, पोलीस आयुक्त अंकूश शिंदेंचे आदेश
यंदा श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत यात्रा पार पाडण्याचे आदेश प्रशासनेतर्फे देण्यात आले आहेत.
सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेवर यंदा निर्बंध लावण्यात आलेले आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येत ही यात्रा पार पडत असते. मात्र यंदा यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत यात्रा पार पाडण्याचे आदेश प्रशासनेतर्फे देण्यात आले आहेत. तर यात्रेच्या कालावधीत सामान्य भाविकांसाठी मंदिर बंद असणार आहे.
शहर, जिल्हा आणि राज्याबाहेरून या यात्रेसाठी भाविक मोठ्यासंख्येने येत असतात. मात्र निर्बंध लावलेले असताना भाविक मंदिरात येऊ नये यासाठी सोलापुरातील काही भागात संचारबंदीचे आदेश पोलिसांनी जारी केले आहेत. सोलापूर शहर पोलिस आय़ुक्त अंकुश शिंदे यांनी ही आदेश दिले आहेत. 12 जानेवारी रात्री 00.01 पासून ते दिनांक 17 जानेवारी रात्री 00.00 पर्य़ंत हे आदेश लागू राहणार आहेत.
साोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट कॉर्नर-हरिभाई देवकरण प्रशालेसमोरील रस्ता-स्ट्रीट रोड-सिद्धेश्वर कन्या प्रशाला-वनश्री नर्सरी-विष्णू घाट-गणपती घाट-सरवस्ती कन्या प्रशाला-भुईकोट किल्याचा आतील परिसर-चार पुतळा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी संबंधित पोलिस ठाण्याकडून रहिवाशी पुरावा दाखवून पासेस प्राप्त करुन घ्यायचे आहेत. इतर बाहेरील व्यक्तींना या परिसरात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
मंदिराजवळील होम मैदान येथे मॉर्निंग वॉक, मैदानी खेळ, सराव, सेल्फी पॉईंट इत्यादी देखील बंद करण्यात असणार आहेत. तसेच यात्रेच्या कालावाधीत संचारबंदी लागू असलेल्या भागातील अत्यावश्यक सेवेच्या आस्थापना वगळून इतर सर्व दुकाने/आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश पोलिस आयुक्त अंकूश शिंदे यानी दिले आहेत. धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी पोलिसांमार्फत दिले जाणारे पासेस असणे आवश्यक असणार आहे. मंदिर परिसरातील मनोरंजन आणि करमणुकीचे, खाद्यपदार्थ, पूजा साहित्य विक्री वगैरे दुकांनाना परवानगी नसल्याने संबंधित दुकानदारांना या परिसरात प्रवेश बंदी असणार आहे.
यात्रेसाठी केवळ 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. या 50 लोकांशिवाय इतर कोणत्याही नागरिकांना मंदिर परिसरात परवानगी नाहीये. त्यामुळे पोलिसांमार्फत बॅरेकेडिंग लावण्याचा कामाला सुरुवात झाली आहे. मंदिराच्या आतील बाजूला तसेच मुख्य प्रवेशद्वारा जवळ पोलिस यंत्रणा तसेच खासगी सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत. संचारबंदी लागू असलेल्या भागात पोलिसांनी ही बॅरिकेंडिग करण्यास सुरुवात केली आहे.