गडचिरोली: छत्तीसगढ राज्यातील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांनी माणुसकीचा उत्तम उदाहरण देत DRG ( District Reserve Guard) च्या जवानाचा मृतदेह घेऊन पुराच्या पाण्यातून वाट काढली.

सुकमा जिल्ह्यातील भेज्जी रहिवासी डीआरजी जवानाचं काल रात्री निधन झाले.  त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी घेऊन जायचा होता. मात्र वाटेत आलेल्या इंजरम नदीला पूर आल्याने तब्बल दोन तास मृतदेह वाटेत अडकून पडला. मात्र सीआरपीएफच्या जवानांनी मृतदेह खांद्यावर घेऊन प्रचंड पुराच्या प्रवाहातून वाट काढत त्या जवानाचा मृतदेह नदी पलीकडे पोहोचवला.



सीआरपीएफच्या 219 चे द्वितीय कमान्डेंट मोहन बिश्ट यांनी जवानांसोबत खांदा देत संपूर्ण नदी पार केली. या कठीण परिस्थितीत मृतदेह सुरक्षित पाण्याच्या प्रवाहातून पार करून दिल्याबद्दल मृत्यू झालेल्या जवानाच्या परिवाराने सीआरपीएफचे धन्यवाद मानले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात सहाय्यक आरक्षक सोहन ठाकूर या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी पोहोचवणं एक आव्हान होतं. कारण पावसामुळं सर्व रस्ते बंद होते. जवानांचं वाहन दोन तास यामुळं अडकून पडलं होतं. या स्थितीत सीआरपीएफच्या जवानांनी खांद्यावर मृतदेह घेत जवानाचा मृतदेह इंजरम नदीच्या पुरातून वाट काढत दुसऱ्या बाजूला पोहोचवला.