पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याने यंदा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांसाठी नियमावली दिली असून यंदा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारून गणेश स्थापना करता येणार नाही. याशिवाय घरगुती अथवा मंडळांच्या बाप्पाचे सार्वजनिक ठिकाणी विसर्जस बंदी घालण्यात आली आहे.


गणेश मंडळातील मूर्ती या चार फुटापेक्षा लहान असाव्यात असे बंधन घालण्यात आले असून मूर्ती स्थापना व विसर्जनास कोणत्याही पद्धतीची मिरवणूक काढण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. यंदा रस्त्यावर मंडप मारून बाप्पाच्या मूर्ती विकण्यास मज्जाव करण्यात आला असून नागरिकांनी ऑनलाईन बुकिंग खरेदी किंवा मूर्तीकारांच्या कारखान्यातून खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.


शिवाय कायमस्वरूपी असलेली मंदिरे, पारंपरिक मंडप आणि गेल्यावर्षी परवानगी काढलेल्या मंडळांना नियम आणि अटींचे पालन करून गणेश मूर्ती स्थापनेस परवानगी दिली जाणार असल्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर आणि जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आहे. मराठी सनातील प्रमुख असलेला बाप्पा विघ्नहर्ता म्हणालो जातो मात्र यंदा बाप्पाच्या वाटेत कोरोनाचे विघन उभे ठाकले आहे.


यंदा नवीन मंडळास ऑफलाईन किंवा ऑनलाईन परवानगी मिळणार नाही. 2019 साली ज्या मंडळांनी परवानगी काढली आहे त्यांना परवानगी दिली असली तरी त्यासाठी रस्त्यावर मंडप, स्टेज टाकता येणार नाही. गणेशमूर्तींच्या आरतीसाठी 10 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून गणेश उत्सव साजरा करावा लागणार आहे. घरगुती बाप्पांचे आपल्या घरीच तर गणेश मंडळांना त्याच जागी मूर्तीचे विसर्जन करावे लागणार आहे. सोलापूर महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात सध्या 7703 कोरोनाचे रुग्ण असून 213 रुग्णांचा यामुळे मृत्यू झाल्याने प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत ही कडक नियमावली लागू केली आहे.