Sand Mafia : वाळू तस्करांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; राजकीय नेत्याच्या निकटवर्तीयाचे कृत्य?
भंडारा उपविभागीय अधिकारी यांना वाळू तस्करांकडून मारहाण झाल्याचे प्रकरण ताजे असताना, आता तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. या निमित्ताने भंडारा जिल्ह्यातील वाळू तस्कराची मुजोरी समोर आली आहे.
Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील मोहाडीचे तहसीलदार दीपक कारंडे यांच्यावर बुधवारी (2 नोव्हेंबर 2022) वाळू तस्करांनी जीवघेणा हल्ला केला. जिल्ह्यातील एका बड्या नेत्याच्या खासगी संघटनेच्या कार्यकर्त्याचे नाव या हल्लाप्रकरणी समोर येऊ लागले आहे. तोच कार्यकर्ता मुख्य सूत्रधार असल्याची चर्चा जिल्ह्यात दबक्या आवाजात सुरू झाली आहे. राज्याचे गृहमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री (Devendra Fadnavis) वाळू तस्करांविरोधात कठोर पावले केव्हा उचलणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
एका बड्या नेत्याच्या आशीर्वादाने तर हा सर्व वाळू तस्करीचा प्रकार तर सुरू नाही ना, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेले मोहाडीचे तहसीलदार दीपक कारंडे यांच्यावर वाळू तस्करांनी काल जीवघेणा हल्ला केला होता. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तहसीलदारांनी त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीने हवेत गोळीबार केला. वाळू तस्करांद्वारे जेसीबीच्या पंजाने तहसीलदार दीपक कारंडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
हल्ल्यानंतर तहसीलदार कारंडे यांनी मोहाडी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर लगेच जेसीबी व टिप्पर चालक, मालक यांच्याविरुद्ध मोहाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून जेसीबी चालकाला अटक केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. वाळू तस्करांवर थेट मोक्का लावण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे आता या प्रकरणी ते स्वतः लक्ष देतात का, याकडे लक्ष लागले आहे.
जेसीबीने प्राणघातक हल्ला
बुधवारी, दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास मोहाडीचे तहसीलदार दीपक कारंडे यांना रोहा या गावी तस्करांनी साठवून ठेवलेली वाळू जेसीपीद्वारे टिप्परमध्ये भरून चोरी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी पथकासह रोहा येथे प्रत्यक्ष भेट दिली असता जेसीबीद्वारे टिप्परमध्ये वाळू भरण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले. तहसीलदारांनी ते काम थांबवून आम्हाला शासकीय कार्यवाही करण्यास मदत करावी, असे आवाहन जेसीबी चालकाला केले. मात्र जेसीबी चालकाने त्यांच्यावर जेसीबीने हल्ला चढविला. तहसीलदारांनी त्यातून स्वतःचा बचाव केला. त्यानंतर जेसीबी चालकाने तिथून जेसीबीसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. तहसीलदारांनी त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला असता जेसीबी चालकाने पुन्हा त्यांच्यावर जेसीबीने जीवघेणा हल्ला केला.
...म्हणून हवेत दोन राऊंड फायर
आपल्या वर दोनदा झालेल्या जीवघेणा हल्ल्यामुळे तहसीलदारांनी स्वत: च्या संरक्षणसाठी त्यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्वरने हवेत दोनदा गोळीबार केला. गोळीबार होताच जेसीबी चालक घाबरून जेसीबी सोडून पळून गेला. या संपूर्ण घटनेची माहिती तहसीलदारांनी मोहाडी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जेसीबी आणि टिप्पर ताब्यात घेतले. मोहाडी तहसीलदार दीपक कारंडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जेसीबी चालक, मालक, तसेच टिप्पर चालक आणि मालक यांच्याविरुद्ध कलम 353, 379 नुसार गुन्हा केला आहे. सध्या जेसीबी चालकाला अटक करण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यामध्ये दोषी आढळल्यास इतरही लोकांवर गुन्हा नोंद करून अटक केली जाईल, असे पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी सांगितले.
फडणवीसांसमोर वाळू तस्करांचे मोठे आव्हान
दरम्यान भंडारा उपविभागीय अधिकारी यांना वाळू तस्करांकडून मारहाण झाल्याचे प्रकरण ताजे असताना आता तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा वाळू तस्कराची मुजोरी समोर आली आहे. आता या प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू असली तरी पोलिसांच्या यादीत मुख्य सूत्रधाराचा समावेश आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे या घटनेचा मुख्य सूत्रधार जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचा खाजगी संघटनेचा कार्यकर्ता असल्याच्या आरोप होऊ लागला आहे. त्यामुळेच एका मोठ्या महसूल अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्याइतपत मजल वाळू तस्करांची झालेली दिसत आहे. इतके मोठे रॅकेट जिल्ह्यात सुरू असताना राज्याचे गृहमंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे वाळू तस्करांचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे आता तरी वाळू तस्करांवर मोक्का लागेल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
महत्त्वाची बातमी