(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंढरपूरमधील दोन डॉक्टरांनी उभारले 50 बेड्सचे कोविड रुग्णालय; बेन्झ सर्किटचा वापर करून होणार ऑक्सिजन बचत
पंढरपूरमध्ये एका बाजूला कोरोनाचे थैमान सुरु असताना रुग्णांना बेड मिळणं दुरापास्त झालं आहे. असं असताना पंढरपूरमधील दोन डॉक्टरांनी पुढे येत 50 बेड्सचे विठ्ठल रुक्मिणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु केलं आहे. डॉक्टरांनी सुरु केलेल्या या रुग्णालयामुळे रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणं सुलभ होणार आहे.
पंढरपूर : संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. दिवसागणिक कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. झपाट्यानं वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला असून रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन आणि बेड्सची कमतरता दिसून येत आहे. रुग्णांना उपचार मिळवण्यासाठी वणवण करावी लागत आहे. असाच काहीसा प्रकार पंढरपुरातही पाहायला मिळत आहे. अशातच दोन डॉक्टरांनी पुढाकार घेत रुग्णांच्या सोयीसाठी खारीचा वाटा उचलला आहे.
पंढरपूरमध्ये एका बाजूला कोरोनाचे थैमान सुरु असताना रुग्णांना बेड मिळणं दुरापास्त झालं आहे. असं असताना पंढरपूरमधील दोन डॉक्टरांनी पुढे येत 50 बेड्सचे विठ्ठल रुक्मिणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु केलं आहे. डॉक्टरांनी सुरु केलेल्या या रुग्णालयामुळे रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणं सुलभ होणार आहे. पंढरपूरमधील डॉ. पंकज गायकवाड आणि डॉ. अमित गुंडेवार यांनी नगरपालिकेच्या 65 एकर क्षेत्रावरील भक्तिसागर येथील इमारतीमध्ये हे हेल्थ सेंटर सुरु केले असून शनिवारी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. एका बाजूला कोविड केअर सेंटर आणि दुसऱ्या बाजूला हे हेल्थ सेंटर सुरु झाल्याने एकाच आवारात रुग्णांची सोय होणार आहे.
या ठिकाणी असलेले सर्व 50 बेड्स ऑक्सिजनचे असून व्हेंटिलेटर आणि इतर सुविधाही देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी बेंझ सर्किट मास्क वापरण्यात येणार असल्याने रुग्णांना गरजेनुसार, ऑक्सिजन मिळून वाया जाणाऱ्या जवळपास 50 टक्के ऑक्सिजनची बचत होणार असल्याचे डॉ. पंकज गायकवाड यांनी सांगितले. या ठिकाणी रुग्णांसाठी थ्री टियर पद्धतीची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी आणखी 50 बेड्स वाढवण्याची तयारी देखील डॉ. पंकज गायकवाड आणि डॉ. गुंडेवार यांनी केली आहे.
पंढरपूर पोटनिवडणुकीनंतर रुग्णसंख्येत पाचपटीने वाढ
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रशासन, राजकीय नेत्यांनी फारसे गांभीर्याने न घेण्याची मोठी चूक केली आणि त्याच काळात पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची घोषणा झाली. यावेळी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका, मोठ्या नेत्यांचे दौरे नियमितपणे सुरु होते. परिणामी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीनंतर परिसरात कोरोनाने कहर केला असून रुग्णसंख्या पाचपटीने वाढली आहे. तर गेल्या 20 दिवसांत 125 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :