Beed News Update : बीडमध्ये क्षीरसागर काका आणि पुतण्यामधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. "राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि आम्ही एकाच छताखाली राहतो. परंतु, एकमेकांचं तोंड सुद्धा पाहत नाही, अशी टिप्पणी नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी केली आहे.
मागच्या आठवड्यात बीडमधील नोंदणी कार्यालयात गोळीबाराची घटना घडल्यानंतर दोन्ही बाजूने परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर यांना बीडच्या सत्र न्यायालयाने अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे. क्षीरसागर पितापुत्रांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरु असून पुढील तारखेपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच रविंद्र क्षीरसागरांच्या अटकपूर्व जामिनावर 5 मार्चला सुनावणी होणार आहे.
अंतरिम जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर आज योगेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी योगेश क्षीरसागर यांना, तुम्ही एकाच छताखाली राहता, बाहेर मात्र टोकाचा विरोध असतो, असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना योगेश क्षीरसागर म्हणाले, "घर म्हणून आम्ही एकत्र असलो तरी आमचे परस्पर काहीच संबंध नाहीत. कुटुंब असल्यामुळे एका छताखाली राहतो. परंतु, एकमेकांसोबत कधी बोलतही नाही. एवढंच नाही तर आम्ही एकमेकांचं तोंड सुद्धा पाहत नाही, अशी टिप्पणी योगेश क्षीरसागर यांनी केली आहे.
"नोंदणी कार्यालयात झालेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज का नाही? असा प्रश्न योगेश क्षीरसागर यांनी यावेळी उपस्थित केला. फुटेजची हार्ड डिस्क गायब झाली का केली? याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न उपस्थित करत, या प्रकरणाची चौकशी व्हावी. याबरोबरच फिर्यादीला आमची नावे घेण्यास कोणी भाग पाडले? याचाही यंत्रणेने तपास करावा अशी मागणी करत आगामी नगरपालिका निवडणुकीत आम्हाला अडकून ठेवण्यासाठी राजकीय हेतूने आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत, असा आरोप योगेश क्षीरसागर यांनी केला आहे.
नोंदणी कार्यालयातील गोळीबाराशी आमचा संबंध नाही : योगेश क्षीरसागर
योगेश क्षीरसागर म्हणाले, "आमच्यावर आरोप करणाऱ्यांवर किती गंभीर गुन्हे आहेत? हे सर्वांना माहित आहे. या वादात सामान्य नागरिकांना इजा झाली असती तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? नोंदणी कार्यालयामधील व्यवहाराशी आमचा काही संबंध नाही. जयदत्त क्षीरसागर यांच्या मालकिची जागा खरेदी करण्यासाठी पवार कुटूंबातील सदस्यांमध्ये व्यवहार होणार होता. त्या रजिस्ट्रीसाठी लिहून देणार किंवा घेणार मी किंवा भारतभूषण नाही. शिवाय रवींद्र क्षीरसागर किंवा इतरांचाही काही संबंध नव्हता. त्यामुळे तेथे आम्ही कोणीच उपस्थित नव्हतो. त्याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिले आहेत. तरीही चुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात आमचे नाव विनाकारण गोवण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण योगेश क्षीरसागर यांनी दिले आहे.
बीड शहरातील नोंदणी कार्यालयात मागच्या आठवड्यात गोळीबार झाला होता. या गोळीबारात दोघे जण जखमी झाले होते. या प्रकरणी योगेश क्षीरसागर आणि त्यांचे वडील भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, कोर्टाने अंतरिम जामीन दिल्यानंतर त्यांनी नोंदणी कार्यालयातील जमिनीच्या व्यवहारात आमचा कोणताही संबंध नव्हता, असे स्पष्ट केले आहे.
एकाच घरात राहून एकमेकांविरोधात लढणाऱ्या क्षीरसागर काका-पुतण्यांच्या बंगल्याची पॉलिटिकल सफर, पाहा व्हिडीओ
महत्वाच्या बातम्या
Beed: भारतभुषण क्षीरसागर, योगेश क्षीरसागराना अंतरिम जामीन मंजूर, रविंद्र क्षीरसागरांच्या अटकपूर्व जामिनावर 5 मार्चला सुनावणी
बीडमधील क्षीरसागर काका-पुतण्या वाद पोलीस स्टेशनमध्ये, एकमेकांविरोधात गुन्हे दाखल
Beed : आमदार संदीप क्षीरसागरांच्या 'झुकेगा नही' डायलॉगला योगेश क्षीरसागरांचं 'मैं हूं डॉनने' प्रत्युत्तर
पुतण्याच्या गटाचे चार नगरसेवक काकांच्या गटात, बीडमधील राष्ट्रवादीचे चार नगरसेवक शिवसेनेत