HSC Exam :  उद्यापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड  परीक्षेला सुरुवात होणार आहे. कोरोना महामारीनंतर ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने राज्यभरात घेतली जात आहे.   कोरोनानंतर पहिल्यांदा बारावीचे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेला सामोरे जाणार आहेत. मात्र कोरोनानंतर होणाऱ्या  परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये जाणून घेऊया. 


बारावीच्या परीक्षेची ठळक वैशिष्टये 


1.  विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने मार्च-एप्रिल 2022 च्या बारावी परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.  परीक्षे दरम्यान महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे.  बोर्डाने प्रसिध्द व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे.


2.  मार्च-एप्रिल 2022  बारावी परीक्षेचे वेळापत्रक 21 डिसेंबरला मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.


3.  5 मार्च आणि 7 मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांची परीक्षा तांत्रिक अपरिहार्य कारणास्तव नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे 5 एप्रिल आणि 7 एप्रिल 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.


4. परीक्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्येतून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय स्तरावर मंडळामध्ये जिल्हानिहाय प्रत्येकी एक किंवा दोन याप्रमाणे समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 


5.  बारावीच्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना  गणित, पुस्तपालन व लेखाकर्म, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅलक्युटर वापरण्यास परवानगी देण्यात येत आहे. विद्यार्थ्याने कॅलक्युलेटर स्वतःचा आणावयाचा आहे. सदर कॅलक्युलेटर फक्त कॅलक्युलेटर स्वरूपातीलच असावा. मोबाईल मधील अथवा इतर इलेक्ट्रॉनिक्स साधनांमधील कॅलक्युलेटर वापरता येणार नाही. 


6.. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा यादृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात भरारी पथके नेमण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्हयामध्ये  दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या असून विशेष महिला भरारी पथक व काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी यांच्या परीक्षा केंद्राना आकस्मिक भेटी व परीक्षा केंद्राच्या परिसराचे व्हिडीओ चित्रिकरण आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सदर परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परीक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्र व उपकेंद्रावर कार्यरत राहणार आहेत. 


8. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व अधिक जबाबदार भावी पिढी निर्माण व्हावी याकरीता व परीक्षा पध्दतीवरील विश्वास व आदर वृध्दींगत होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांच्या मदतीने 'गैरमार्गविरूध्द लढा' हे अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले आहे. 


9.  परीक्षेसाठी परीक्षार्थी, मुख्याध्यापक/प्राचार्य यांना प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी, प्रकल्प व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. 


10.  बोर्डाने केलेल्या कालावधीत विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यामुळे किंवा अन्य वैद्यकीय/अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प व तत्सम परीक्षा देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची सदर परीक्षा लेखी परीक्षेनंतर 31 मार्च  ते 18 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. 


11.  कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता ऑफलाईन पध्दतीने आयोजित परीक्षांसाठी पुढील उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत



  •  शाळा /कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर परीक्षा केंद्र/उपकेंद्र देण्यात आले आहे. 

  • 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

  • बारावीसाठी किमान 40 टक्के प्रात्यक्षिकांवर आधारित प्रात्यक्षिक परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे

  •  लेखी परीक्षेच्या 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनीटे जादा वेळ, तसेच 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनीटे जादा वेळ देण्यात आलेला आहे.

  •  प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंतर्गत व बहि:स्थ परीक्षक संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामधून नियुक्त करण्यात आलेले आहेत. 

  • विविध परीक्षांसाठी विद्यार्थी व संबंधित घटकांसाठी कोविड-19  संदर्भात सर्व सूचनांचे  पालन करणे अनिवार्य असल्याचे कळविण्यात आले आहे. 

  •  नेहमीपेक्षा सुमारे 15 दिवस उशिराने परीक्षेचे आयोजन


12.  बारावी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका देताना एका वर्गासाठी 25 प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र सिलबंद पाकिट याप्रमाणे पाकिटे देण्यात येणार आहेत. 


13.  25 प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकिट पर्यवेक्षक आपल्या परीक्षा कक्षातील दोन परीक्षार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन आणि स्वतःची स्वाक्षरी करून उघडतील. त्यामुळे प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्यास आणखी मदत
होणार आहे. 


14.  उत्तरपत्रिका व पुरवण्या यांची अदलाबदल होऊ नये यासाठी सर्व उत्तरपत्रिका व पुरवण्यांवर बारकोडची
छपाई करण्यात आलेली आहे.


15.  मार्च-एप्रिल 2022 च्या परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना/ सर्व शाळांना ऑनलाईन प्रवेशपत्रिका  देण्यात आलेल्या आहेत. सदर प्रवेशपत्रावर मराठी व इंग्रजीतून सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच प्रवेशपत्रावर विषयासमोर दिनांक व सत्र (सकाळ/दुपार) याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 


16.  प्रचलित पध्द्तीप्रमाणे 'माहिती तंत्रज्ञान' या विषयाची परीक्षा ऑनलाईन पध्द्तीने घेतली जाणार असून या
विषयासाठी एकूण 1,47, 775  विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून सदर विद्यार्थी 1829 केंद्रांवरून परीक्षेस प्रविष्ठ होणार आहेत. तसेच 'सामान्यज्ञान' या विषयाची परीक्षा ऑनलाईन होत असून या विषयासाठी एकूण 1914 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून 44 केंद्रांवरून विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होणार आहेत. 


17.  विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे वाचन व आकलन होणेसाठी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून, तो सर्व संबंधितांना कळविण्यात आलेला आहे.


संबंधित बातम्या :


Board Exam : दहावी बारावीच्या परीक्षेसाठी शाळा न देण्याच्या निर्णयावर संस्थाचालक ठाम, उद्या निर्णय घेणार


HSC Exam : NDA ची मुलाखत देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा, बोर्डाकडून 'एबीपी माझा' च्या बातमीची दखल


HSC Board Exam : बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल, मराठी आणि हिंदीचा पेपर पुढे ढकलला