Corona Update : गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. तिसऱ्या लाटेनंतर देशातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. त्यामुळेच सर्व राज्यांनीही हळूहळू कोरोनाबाबत घालण्यात आलेले निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दहा देशांमध्ये 56.42 टक्के नवीन रूग्णांची नोंद होत आहे. परंतु, भारतात कोरोनापासून सातत्याने दिलासा मिळत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.


गेल्या दोन-अडीच वर्षांपासून जगभरावर कोरोना महामारीचं सावट होतं. परंतु,आता कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. डिसेंबर 2021 च्या शेवटी आणि जानेवारीच्या सुरूवातीला भारतात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत होती. परंतु, जानेवारीच्या मध्यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. रूग्णांमध्ये घट होत असली तरी पूर्णपणे कोरोना संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.  


आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, जगात अजूनही 15 लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे कोरोनाबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. देशात लसीकरण जास्त वेगाने झाल्यामुळे तिसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रभाव कमी होता. दुसऱ्या लाटेत कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरिकांचे  प्रमाण फक्त दहा टक्के होते. परंतु, तिसऱ्या लाटेत हे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त होते. तिसऱ्या लाटेत देशभरातील  90 टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला होता.


"कोरोनाची दुसरी लाट 117 दिवसांची होती. परंतु, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत लसीकरणाचे प्रमाण वाढल्यामुळे तिसरी लाट फक्त 42 दिवसच होती. दुसऱ्या लाटेत देशभरात जवळपास दोन लाख 52 हजार लोकांचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या लाटेत 27 हजार कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात एका आठवड्यात सरासरी 11 हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. जगभरातील कोरोना रूग्णांच्या तुलनेत भारतात हे प्रमाण 0.7 टक्के एवढेच आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.  


आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 77 हजार 152 असून गेल्या 24 तासांत 6 हजार 561 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाबत राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. ज्या राज्यांमध्ये कोरोना आटोक्यात आला आहे, तेथे सर्व प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करता येणार आहे. यबरोबरच शॉपिंग कॉम्प्लेक्सही सुरू करता येतील. ऑफलाइन क्लासेस सुरू करता येतील,असे मार्गदर्शक तत्त्वात सांगण्यात आले आहे.  


महत्वाच्या बातम्या