बीड : काका-पुतण्याच्या राजकीय संघर्षाची किनार असलेल्या बीड जिल्ह्यातील चार नगरसेवकांनी पुतण्याला रामराम ठोकून काकाचे नेतृत्व मान्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाचे चार नगरसेवक आता जयदत्त क्षीरसागर गटामध्ये सामील झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा एक नगरसेवक शिवसेनेमध्ये गेला होता आता चार नगरसेवक राष्ट्रवादीला सोडून गेल्याने पुतण्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


एक वर्षांपूर्वी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर संदीप क्षीरसागर आमदार झाले. पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी संदीप शिरसागर यांच्या मागे मोठं बळ उभं केलं. आता संदीप क्षीरसागर यांच्याकडून डावलले जात असल्याची भावना या नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.


काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब गुंजाळ यांचा शिवसेनेत प्रवेश झाला होता. त्यानंतर आज (30 जानेवारी) नगरसेवक गणेश तांदळे, प्रभाकर पोपळे, रणजित बनसोडे आणि भैयासाहेब मोरे यांनी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील चार नगरसेवक हे शिवसेनेमध्ये डेरेदाखल झाल्याने महाविकास आघाडीतील धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


बीडच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये नाना विकास आघाडीकडून निवडणूक लढवलेले संदीप क्षीरसागर गटाचे 20 नगरसेवक होते, त्यापैकी आतापर्यंत आठ नगरसेवकांनी संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाला सोडचिठ्ठी दिली आहे.


रक्ताची नाती तोडणाऱ्यांनी जनतेचे भले केलेले कधी कुणी पाहिले आहे का? : भरतभूषण क्षीरसागर
चार नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधल्यानंतर यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, "राजकारणात काम करत असताना आपल्या परंपरेत राहूनच काम करावे लागते. घरात मोठ्यांचा सन्मान ठेवणे ही संस्कृती आहे. पदासाठी रक्ताची नाती तोडणाऱ्यांनी जनतेचे भले केलेले कधी कुणी पाहिले आहे का? असा सवाल करत 35 वर्षापासून मी नगराध्यक्ष आहे. मलाही आमदारकीसाठी अडून बसता आले असते, पण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या मोठ्यांचा मान राखायला हवा. स्वकर्तृत्वाने राजकारणात यश मिळवावे लागते. ज्यांच्या बोटाला धरुन आपण मोठे होतो त्यांच्याशी बेईमानी करुन जनाधार मिळत नसतो. अण्णासारखे शांत संयमी आणि कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारे नेतृत्व असल्याने मला पदाचा कधीही मोह पडला नाही. जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडली. ज्यांनी आज प्रवेश केला आहे त्यांना आम्ही कुटुंबातील सदस्याप्रमाणे सन्मानाची वागणूक देऊ."