कोरोनाचा वाढता धोका लक्षात अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार सुरु, विजय वडेट्टीवार यांची माहिती
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे शाळा सुरु ठेवाव्यात की नाही. दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन घ्यावी याबद्दल वेगवेगळे विचार आहेत. त्यावर विचार करून निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक होणार आहे.
नागपूर : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता सरकार अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार करत असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. संध्याकाळी 6 नंतर पहाटेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीनुसार तिथल्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्याबाबत निर्णय घ्यावे, असे निर्देश सरकारने दिल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
मात्र, त्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने लोकांनी काळजी घेतली नाही तर लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला आहे. सध्या विरोधक असो किंवा सत्ताधारी सर्वच राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत. मात्र, कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता आता सर्वच पक्षांनी आंदोलनापासून दूर राहिले पाहिजे. नेत्यांनीही अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
कोरोना नियम पाळण्यात 'आम्हीच चुकतोय', मंत्री विश्वजित कदमांची प्रांजळ कबुली
दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन घ्यावी याबाबत विचार सुरु
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे शाळा सुरु ठेवाव्यात की नाही. दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन घ्यावी याबद्दल वेगवेगळे विचार आहेत. त्यावर विचार करून निर्णय घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक होणार असून त्यात चर्चा करून निर्णय घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जातोय
अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असून नुकसानीचा आढावा घेतला जात आहे. विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगने चर्चा करून सर्व माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. विदर्भ वैधानिक विकास मंडळ अस्तित्वात नसले तरी विदर्भाचे मंत्री असल्याने आम्ही विदर्भाच्या वाट्याचा निधी कोणीही पळवणार नाही याबद्दल दक्ष असल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला.