रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात दुबईहून आलेल्या 50 वर्षीय रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर रूग्णाला जिल्हा रूग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात आले. शिवाय, गुहागरमधील शृंगारपूर हे गाव देखील क्वारंटाईन करण्यात येत खबरदारीचे उपाय योजिले गेले. दरम्यान, यानंतर रूग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा शोध घेतला गेला. त्यांच्या देखील चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये रूग्णाची पत्नी आणि भावाचा देखील समावेश आहे. या दोघांचे रिपोर्ट देखील आता समोर आले आहेत. या रिपोर्टमध्ये नेमकं काय असणार आहे? रिपोर्ट पॉझिटीव्ह की निगेटिव्ह? याकडे देखील जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांचे लक्ष होते. पण, समोर आलेले रिपोर्ट हे सर्वांना दिलासा देणारे असेच आहेत. कारण, रूग्णाच्या पत्नीचे आणि भावाचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. शिवाय, शृंगारतळी या गावातील रूग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर दोघांचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले आहेत. जवळपास 15 संशयितांचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्या सर्वांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणेला देखील मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाला संपवण्यासाठी ही लढाई जिंकण्यासाठी सध्या जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलिसांसह सर्वच जण प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत.


Coronavirus | महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा शंभरी पार, रुग्णांची संख्या 101 वर


काय आहे रत्नागिरी जिल्ह्याची स्थिती?


रत्नागिरी जिल्ह्यात सध्यातरी एकच जण हा कोरोनाग्रस्त आहे. त्याची प्रकृती देखील दिवसेंदिवस उत्तम होत आहे. त्याबाबत कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असून नागरिकांनी केवळ सहकार्य करावं, असं आवाहन यावेळी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून केले जात आहे. राज्यात दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन देखील सतर्क झाले आहे. त्यामुळे नागरिकांना आवाहन करत त्यांच्यामध्ये कोरोनाबाबतची जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन देखील यावेळी करण्यात येत आहे. काही संशयित हे जिल्हा रूग्णालयात आहेत. तर काहींना त्यांच्या घरातच क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेले आहे.

नागरिकांना आवाहन


रविवारी जनता कर्फ्यू यशस्वी झाल्यानंतर रविवारी संध्याकाळी राज्यात जमाव बंदी लागू करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली. त्यानंतर कोरोनाविरोधातील लढाई आणखी तीव्र होईल अशी आशा होती. पण, मुंबई, पुणेसह राज्यातील इतर शहरांमधील चित्र काही आश्वासक नव्हते. नागरिक आपल्या खासगी वाहनानं मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्याचं दिसून आले. दरम्यान, कोरोनाला हरवण्यासाठी केवळ एक दिवस नाही तर पुढचे 15 दिवस महत्त्वाचे आहेत, असे आवाहन सध्या सरकार आणि प्रशासन करताना दिसत आहे. त्यानंतर सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यात वाहतूक पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 1614 वाहन चालकांकडून तब्बल 6 लाख 29 हजार 600 रूपयांचा दंड वसुल केला आहे. आम्ही केलेली ही दंडात्मक कारवाई विक्रमी म्हणून पाहण्यापेक्षा आजची परिस्थिती गंभीर आहे. नागरिकांनी सहकार्य करावं. केवळ हौस म्हणून ही कारवाई करण्यात आलेली नाही. नियम पाळा आणि कोरोनाला हरवा असे आवाहन देखील यावेळी वाहतूक पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.


संबंधित बातम्या :


coronavirus | 19 मार्चपर्यंत देशातून व्हेंटिलेटर, मास्कची निर्यात हा तर गुन्हेगारी कट : राहुल गांधी

Lockdown and Curfew | लॉकडाऊन आणि कर्फ्यू यामध्ये फरक काय?

Coronavirus | IIT दिल्लीकडून नवी पद्धत विकसित, कोविड-19ची स्वस्त चाचणी शक्य?

Coronavirus | भारतावर कोरोनाचं सावट! कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उद्योजकांचा मदतीचा हात

Curfew in Maharashtra | महाराष्ट्रात संचारबंदी लावण्याची वेळ का आली? | स्पेशल रिपोर्ट