पालघर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी डहाणू येथील अदानी थर्मल पॉवर स्टेशनने 31 मार्चपर्यंत निम्म्या कर्मचाऱ्यांवर प्लांट चालवून शासनाला सहकार्य करणारा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 23 मार्चच्या मध्यरात्रीपासून ते 31 मार्च या कालावधीत प्लांटचा गेट बंद केला जाणार असून अन्य कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे.


या वीज निर्मिती केंद्रात 1400 कर्मचारी तीन प्रहरात काम करतात. येथे कोळशापासून तयार होणारी वीज मुंबईला पाठवली जाते. हा कोळसा परदेशातून मालवाहू जहाजाद्वारे डहाणूच्या समुद्रात आणला जातो. कोरोना विषाणूचे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असताना, मुंबई पोर्ट ट्रस्टने परदेशी जहाजांना बंदरात थांबण्यापूर्वी जे नियम घालून दिले होते. ते सर्व कसोशीने पाळण्याचे धोरण या प्लांटने अंमलात आणले, शिवाय त्याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली होती. कोरोनाचा वाढता संसर्ग थांबविण्याकरिता शासनाने नोकर कपात करण्याचे आवाहन केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचे धोरण व्यवस्थापनाने घेतले आहे. त्यानुसार कर्मचारी कपात केली जाणार आहे.


या प्लांटमध्ये कंपनीने ज्या कर्मचाऱ्यांना गृह संकुलाचे सुविधा उपलब्ध करून दिली आहे, त्यांच्याकडून आगामी काळात हे काम करून घेतले जाणार आहे. तर डहाणू आणि बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे. 23 मार्चच्या मध्यरात्रीपासून प्लांटचा गेट बंद केला जाणार आहे. त्यामुळे बाहेरील कोणीही आता आणि आतील कोणीही बाहेर जाऊ शकणार नाही. फक्त अति महत्वाच्या कामाकरिता तो उघडला जाईल. गरज पडल्यास 31 मार्चनंतरही हा कालावधी वाढवला जाईल अशी माहिती समोर आली आहे.


राज्यात आजपासून संचारबंदी


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नाईलाजास्तव मला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यात कोरोना विषाणू जास्त पसरू नये म्हणून जिल्ह्याजिल्ह्यातील सीमाही बंद करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. सोबतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरुच राहणार आहेत.


coronavirus update | सांगली जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे रूग्ण