नवी दिल्ली : दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या 'कोविड-19' आजाराच्या चाचणीसाठी नवी पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमुळे चाचणीचा खर्च कमी होणार आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये (एनआयव्ही) वैद्यकीय नमुन्यांवर या चाचणीचा अभ्यास केला जात आहे.


देशातील काही खासगी प्रयोगशाळांना कोरोनाची चाचणी करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली. 'एनएबीएल'ची मान्यता असलेल्या तसंच आरएनए विषाणूसाठी 'रिअल टाईम पीसीआर एसए' असलेल्या सर्व खासगी प्रयोगशाळांमध्ये 'कोविड-19'ची चाचणी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) शनिवारी या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोविड-19च्या चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांना 4500 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारता येणार नाही, असे निर्देशही सरकारने शनिवारी (21 मार्च) दिले होते.


Corona | मुंबई, पुण्यात नव्या कोरोना तपासणी केंद्रांना मान्यता


'प्रोब फ्री डिटेक्शन एसे' असं या चाचणीचं नाव आहे. आयआयटी दिल्लीच्या प्रयोगशाळेमध्ये या चाचणीचं परीक्षण केलं आहे. या महामारीची व्याप्ती पाहता कोविड-19च्या चाचणीसाठी स्वदेशी किट तयार करणं गरजेचं होतं, असं या संशोधकांनी म्हटलं आहे. शिवाय खासगी प्रयोगशाळांमधील खर्चाच्या तुलनेत या पद्धतीने ही चाचणी स्वस्तात होईल आणि सामान्यांनाही परवडेल, असंही ते म्हणाले.


नव्या पद्धतीमुळे कोरोनाची चाचणी स्वस्तात होणार आहे. "सर्वसमावेशक क्रमाचे विश्लेषण वापरुन आम्ही कोविड-19 मधील वैशिष्ट्यपूर्ण घटक निश्चित केले आहेत. हे वैशिष्ट्यपूर्ण घटक इतर मानवी कोरोना विषाणूंमध्ये आढळत नाहीत. त्यामुळे 'कोविड19'चा शोध घेणं शक्य होतं," असं संशोधकांच्या पथकाचे प्रमुख प्राध्यापक विवेकानंद पेरुमल यांनी सांगितलं. सध्या आम्ही एनआयव्हीकडून नव्या पद्धतीला मंजुरीची प्रतीक्षा आहे. मंजुरी मिळाल्यानंतर यावर वेगाने काम होईल, असंही ते म्हणाले.


मुंबई, पुण्यात नवी कोरोना तपासणी केंद्र
मुंबईतील परळ येथील हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना करोना चाचणी केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय पी. डी. हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, टाटा मेमोरियल सेंटर ऍडव्हान्सड सेंटर फॉर ट्रीटमेन्ट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कँसर, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, थायरोकेयर लॅबरोटरीज, एस.आर. एल. डायग्नोस्टिक आणि रिलायन्स लॅबरोटरीज,नवी मुंबई या खासगी केंद्रांचा यात समावेश आहे. या प्रयोगशाळांना करोना तपासणीसाठी तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.