Corona Vaccine : राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Corona Vaccine : नागरिकांनी टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.
मुंबई : विक्रमी संख्येने दर दिवशी कोरोना लस देण्याची राज्याची तयारी आहे. यापूर्वी देखील तसे डोस दिले आहेत. आता लसीकरणाला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 30 नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.
आपआपल्या जिल्ह्यात 100 % लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असे निर्देश दिले आहे. तसेच समाजातील सर्व स्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या (3 नोव्हेंबर) कोविड लसीकरण आढावा घेणार असून यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे पूर्वतयारी बैठक झाली.
नागरीकांनी बेफिकीर होऊ नये
कोविडचे संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोविड गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांना सतत करुन द्यायला हवी. लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्तन ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहिम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात आहेत. प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणबाबत संदेश दाखविण्यात यावेत, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण मोहिमेत स्थानिक पदाधिकारी यांचा सहभाग घ्यावा. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्कर यांना लसीचे दोन्ही डोस अनिवार्य करण्यात यावेत. डोंगरी भागात मोबाईल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे, असे सांगितले.