Nagpur Covid : विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही होणार कोरोना चाचणी, मनपाचा पुढाकार
नागपूरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यावर नियंत्रणासाठी आता विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही कोरोना चाचण्या करा असे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.
नागपूर : नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यादृष्टीने सुरक्षात्मक उपाययोजना आवश्यक असून कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्याकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जास्तीत जास्त कोरोना चाचणीवर भर देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे.
दिल्ली आणि मुंबई येथून विमानाने येणाऱ्या प्रवाशांनी तसेच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनी चाचणी करण्याचेही निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव घरी असलेले ज्येष्ठ नागरिक, आजारी नागरिकांना व लहान मुलांना होणार नाही. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाद्वारे बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजार अशा सर्व गर्दीच्या ठिकाणी सुपर स्पेडर्स ठरणाऱ्या व्यक्तींच्या चाचणीवरही भर देण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांवर सुद्धा प्रवाश्यांची चाचणी केली जाणार आहे. कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे. तसेच त्यांनी गर्दीच्या ठिकाणी किंवा समारंभात मास्कचा वापर करणे, शारिरिक अंतर ठेवण्याचे आवाहन केले.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मंगळवारी मनपा मुख्यालयातील कोरोना वॉर रूमध्ये आरोग्य विभागाची एक महत्वाची बैठक घेण्यात आली. बैठकीत आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी नरेंद्र बहिरवार, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी विजय जोशी, डॉ. भावना सोनकुसळे, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अतिक खान, डॉ. विजय तिवारी, डॉ. शुभम मनगटे, डॉ. सागर नायडू यांच्यासह इतर झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी आयुक्तांनी सर्व झोनमध्ये कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून बचावाच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. वाढत्या संसर्गाच्या साखळीवर वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे.
यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश
यासाठी सर्वप्रथम कोरोना संशयीत तसेच लक्षणे आढळणा-या व्यक्तींची चाचणी करणे आवश्यक असून त्यांची RTPCR चाचणी करण्यात यावी आणि बाजारपेठेत Rapid antigen test केली जावी. रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी. कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रवासाची पार्श्वभूमी लक्षात घेउन त्यांची सर्व ट्रॅव्हल हिस्ट्री काढण्यात यावी. त्यांच्या संपर्कातील सर्व निकटवर्तीयांची चाचणी करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले. पुढील संभाव्य धोक्याचा सामना करण्याच्या दृष्टीने मनपाची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज करून हॉस्पीटल्स, वैद्यकीय कर्मचारी, ऑक्सिजन प्लांट, औषधे आदी सर्व सुस्सज करण्याचेही निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले.