उद्याचा निकाल जर सरकारच्या विरोधात गेला तर पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडेल: विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar : ओबीसीचा डेटा गोळा करण्यासाठी मध्यप्रदेशात जी पद्धत वापरली गेली, तीच पद्धत आपण अवलंबिली आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
नागपूर : बहुमत चाचणीच्या आदल्या दिवशी अध्यक्षपदासाठी सरकारकडे प्रचंड बहुमत (164 ) होतं, त्यामुळे आम्ही बहुमत चाचणीच्या दिवशी गेलो काय आणि नाही गेलो काय, निकालावर काही परिणाम होणार नव्हते असं वक्तव्य राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. उद्याचा निकाल जर सरकारच्या विरोधात गेला तर राज्यात पुन्हा एकदा भूकंप घडेल असंही ते म्हणाले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, "आमदारांच्या अपात्रतेबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा उद्याचा निर्णय घटनेनुसार आणि कायद्याला धरून असणे अपेक्षित आहे. उद्याच्या निकालावर महाराष्ट्रसह देशाचा लक्ष आहे. म्हणूनच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबविला आहे. जर उद्याचा निर्णय सरकारच्या विरोधात गेला तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात भूकंप घडेल. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल हे आता सांगता येत नाही."
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "आम्ही 11 आमदार बहुमत चाचणीला उशिरा पोहोचलो आणि चर्चेला पेव फुटले. बहुमत चाचणीच्या दिवशी मी 9 मिनिट उशिरा पोहोचलो. आम्हाला वाटले होते की आधी चर्चा होईल नंतर मतदान होईल. मात्र, आमची अनुपस्थिती लक्षात घेऊन लगेच पोल मागितला. आम्हाला जाणूनबूजून हे करायचे असते तर आम्ही बहुमत चाचणीच्या दिवशी विधान भवनात गेलोच नसतो. कोणी ही आमच्या बद्दल संभ्रम ठेऊ नये."
बांठीया समितीचा अहवाल सरकारकडे
राज्यातील ओबीसी आरक्षणासंबंधी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "12 तारखेला सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल, निवडणुका थांबतील का हे सांगता येत नाही. मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी आमची भूमिका आहे. शाळा किंवा इतर ठिकाणाहून ओबीसींची संख्या मिळविली तर ती 38 ते 45 टक्के भरते. त्यात भटक्या जमातीची संख्या जोडली तर ओबीसी संख्या 54 टक्केच्या पुढे होते. त्यामुळेच घटनेत ओबीसी समाजासाठी 27 टक्के आरक्षण दिले होते. आता त्यात कमतरता होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी."
ओबीसीचा डेटा गोळा करण्यासाठी मध्यप्रदेशात जी पद्धत वापरली गेली, तीच पद्धत आपण अवलंबिली आहे. त्यामुळे जर मध्यप्रदेशचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात मान्य होत असेल तर महाराष्ट्राचा अहवालही मान्य व्हावा असं विजय वडेट्टीवार म्हणाले.