Congress : विधानपरिषदेमध्ये काँग्रेसच्या फुटलेल्या सात आमदारांवर कारवाई करा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
Prithviraj Chavan: विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे काही आमदार उशीरा आले, ही बाब चांगली नसल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी हायकमांडला कळवलं आहे.
मुंबई: शिवसेनेपाठोपाठ आता राज्यातल्या काँग्रेसमध्येही अंतर्गत विरोधी आवाज येत आहे. विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या सात आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या एका उमेदवाराला, चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी काँग्रेसची काही मतं फुटल्याचं स्पष्ट झालं होतं. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमधून चंद्रकांत हंडोरे हे पहिल्या पसंतीचे उमेदवार तर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार होते. चंद्रकात हंडोरे यांना एक दलित चेहरा म्हणून काँग्रेसने पुढं आणलं होतं. पण त्यांना पहिल्या पसंतीची मतंही मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांचा पराभव झाला.
सुरुवातीला काँग्रेसची केवळ तीन मतं फुटली असल्याचं सांगण्यात येत असलं तरी आता सात मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. अंतर्गत वादामुळे काँग्रेसच्या सात आमदारांनी हंडोरे यांना मतदान केलं नसल्याचं समोर आलं. ही बाब पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. या आमदारांवर कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
फुटलेले आमदार कोण आहेत याची चौकशी झाली पाहिजे, ही बाब गंभीर असून याची दखल घेतली पाहिजे अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे काही आमदार उशीरा आले, ही बाबही चांगली नसल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी हायकमांडला कळवलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत, त्यामुळे या प्रकरणावर त्यांनी आपलं मत तातडीने एच के पाटील यांना कळवलं आहे. एकीकडे शिवसेनेत उभी फुट पडली असताना दुसरीकडे आता काँग्रेसमध्येही याचे पडसाद पडत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे काँग्रेसमधले फुटलेले हे सात आमदार कोण आणि त्यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार याची उत्सुकता आता लागली आहे.