Satish Uke : नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंना अटक; 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीची कारवाई
Nana Patole : नाना पटोले यांचे वकील असलेल्या सतीश उकेंच्या घरी आज ईडीने छापेमारी केली होती. त्यांना आता अटक करण्यात आली आहे.
नागपूर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे वकील असलेल्या सतीश उकेंना ईडीने अटक केली आहे. जमीन व्यवहारांसंबंधी एका प्रकरणात ईडीने त्यांच्यावर आज छापेमारी केली होती. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर त्यांना आता अटक करण्यात आली आहे.
सतीश उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील असून त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विरोधातील केसमध्येही ते नाना पटोले यांचे वकील आहेत.
सतीश उकेंना अटक केल्यानंतर आता त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यानंतर ट्रान्झिट रिमांडसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रिमांड मिळाल्यानंतर त्यांना मुंबईत आणण्यात येईल.
जमीन गैरव्यवहार प्रकरणी सतीश उके नागपूर पोलिसांच्या रडारवर होते. 2018 साली त्यांना एका जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकही झाली होती. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोन महिन्यांची शिक्षा सुनावल्यानंतरही ते पोलिसांना शरण न आल्याने त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेशही नागपूर खंडपीठाने दिले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हे लपवल्याचा आरोप करत सतीश उकेंनी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha