'और कितना फेकोंगे मोदीजी, हद्द झाली राव', पंतप्रधान मोदींवर नाना पटोलेंचं ट्वीटरास्त्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आपण बांग्लादेश मुक्तीसाठी सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहादरम्यान मला तुरुंगवासही झाला होता', असं म्हटलं. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत असून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील ट्वीट करुन टीका केली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बांग्लादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी तिथं एका कार्यक्रमात बोलताना 'आपण बांग्लादेश मुक्तीसाठी सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहादरम्यान मला तुरुंगवासही झाला होता', असं म्हटलं. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत असून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील ट्वीट करुन टीका केली आहे. नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, 'और कितना फेकोंगे मोदीजी, हमारे मराठी में एक लाईन है.... हद्द झाली राव..' असं त्यांनी म्हटलंय. पटोले यांनी म्हटलं आहे की, शेतकरी आंदोलनावर एकही शब्द आपण बोलला नाहीत. आणि आता स्वातंत्र्याच्या गोष्टी करायला बांग्लादेशला गेलात. शेतकऱ्यांना आपण आंदोलनजीवी म्हटलं होतं, आता तुम्ही कोण ढोंगीजीवी का, असं पटोले यांनी म्हटलं आहे.
और कितना फेकोंगे मोदी जी.....
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 26, 2021
हमारे मराठी मे एक लाईन है.... हद झाली राव..
किसान आंदोलन कर कर एक शब्द तक आपके मुह से निकला नही.... और आझादी की बात करने बांग्लादेश जाते हो...... किसानो को आंदोलनजीवी आपने कहा था.... आप कोण हुए अब ढोंगीजीवी. https://t.co/H8g3AQk47C
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शुक्रवारी बांग्लादेशमध्ये बोलताना म्हटलं होतं की, बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या संघर्षात सहभागी होणे माझ्या जीवनातील आंदोलनांपैकी महत्त्वाचे आंदोलन होते. वयाच्या वीस-बावीसाव्या वर्षी मी माझ्या सहकाऱ्यांसह बांग्लादेश मुक्तीसाठी सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहादरम्यान मला तुरुंगवासही झाला होता,' असं मोदींनी म्हटलं होतं.
मोदी यावेळी म्हणाले की, बांग्लादेशच्या स्वातंत्र्य संघर्षाला समाजातील प्रत्येक स्तरातून पाठिंबा मिळाला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका सर्वांनाच ठाऊक आहे. बांग्लादेशमधील नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचारामुळे आम्ही व्यथित झालो होतो. या अत्याचाराची छायाचित्रे पाहून अनेक दिवस झोपही लागली नव्हती. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांची सरकार सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे. परस्परांमधील आत्मविश्वास आणि सहकार्यामुळे प्रत्येक अडचणी, समस्यांवर तोडगा काढला जाऊ शकतो. सीमाप्रश्नी झालेला करार हा हेच दर्शवत आहे, असंही मोदी म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
