एक्स्प्लोर
काँग्रेस नेते हुसेन दलवाई 'सामना'च्या कार्यालयात दाखल, सत्तास्थापनेवरुन राजकीय हालचालींना वेग
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई हे नुकतेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेवरुन राजकीय हालचालींना वेग आल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
मुंबई : सत्तास्थापनेवरुन शिवसेना-भाजपमधील कलगीतुरा संपण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे भाजपशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. अशातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई हे नुकतेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेवरुन राजकीय हालचालींना वेग आल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सामनाद्वारे शिवसेना आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत भाजपला लक्ष्य करत आहेत. भाजपने मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन पाळले नाही तर शिवसेना इतर पर्यायांचा विचार करेल, अशी भूमिका शिवसेनेची आहे. राज्यातील सत्तेची समीकरणे अद्याप जुळण्याचे नाव घेत नाही. काही नेते ही समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी हुसेन दलवाई यांनी सामनाच्या कार्यालयात संजय राऊत यांची भेट घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'आम्ही विरोधी बाकावरच बसणार', अशी भूमिका घेतली आहे. तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा, अशी मागणी काँग्रेसमधील काही नेत्यांची आहे.
निवडणुकीचे निकाल लागले त्या दिवशी एबीपी माझाशी बोलताना येत्या काळात गरज पडल्यास शिवसेनेला काँग्रेस पाठिंबा देऊ शकतं, अशी भूमिका काँग्रेस नेते हुसेन दलवाई आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली होती.
निवडणुकीच्या निकालापासून हुसेन दलवाई शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल आहेत. तीन दिवसांपूर्वी दलवाई यांनी याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये दलवाई यांनी म्हटले की, महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास काँग्रेसने त्यांना पाठिंबा द्यावा.
दलवाई यांनी पत्रात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत खूप फरक आहे. त्यांचं राजकारण आता सर्वसमावेशक झालं आहे. त्यामुळे त्यांना आपण पाठिंबा देण्यास हरकत नाही. प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना काँग्रेसने जेव्हा राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली होती, तेव्हा शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायला हवा. भाजपचं राजकारण टोकाचं आहे. मॉब लिन्चिंगबाबतच्या त्यांच्या भूमिका चुकीच्या आहेत. असेही दलवाई यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, संजय निरुपम यांच्यासह काही ज्येष्ट नेत्यांनी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, अशी भूमिका मांडली आहेत. तर हुसेन दलवाई, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम यांच्यासह पक्षातील तरुण नेते हे शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल आहेत.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement