उपराजधानीतील अनियोजित विकासकामे आणि सिमेंट रस्त्यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक; कामांच्या चौकशीची केली मागणी
Nagpur News : नागपुरातील अनियोजित विकास कामे आणि चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांच्या विरोधात आता काँग्रेस पक्षानेही उडी घेतली आहे.
Nagpur News नागपूर : नागपुरातील अनियोजित विकास कामे आणि चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांच्या विरोधात आता काँग्रेस (Congress) पक्षानेही उडी घेतली आहे. एकीकडे नागपूर शहरातील (Nagpur News) अनियोजित विकासकामामुळे नागरिकांची वाताहात होत असताना या विकासकार्याच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन करत या बाबत आपले आक्षेप नोंदवले होते. त्यासाठी आंदोलन करून या अनियोजित विकासकामांना विरोध दर्शवत घोषणाबाजी केली होती. तर आता या सर्व प्रकरणात काँग्रेस पक्षाने हस्तक्षेप करत या अनियोजित विकासकामे आणि सिमेंट रस्त्यांच्या कामाची चौकशी करा, अशी मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) केली आहे. नागरिकांचा पाठिंबा घेण्यासाठी काँग्रेसने यासाठी खास टोल फ्री नंबर ही जारी केला आहे.
नागपूरसाठी एक नवा मास्टर प्लॅन तयार करावा- विकास ठाकरे
मोठा पाऊस होऊनही दहा वर्षांपूर्वीपर्यंत नागपूर शहरात कधीही पूरसदृश्य स्थिती निर्माण होत नव्हती. मात्र गेले दहा वर्ष सातत्याने नागपूरकरांना शहरात पूरसदृश्य स्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनियोजित पद्धतीने होणारे विकास काम, तसेच अत्यंत उंच बांधल्या जाणाऱ्या सिमेंट रोड त्यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. गेल्या काही वर्षात नागपुरात बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांची तसेच अनयोजित विकास कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ही काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे. राज्य सरकार आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी सर्व परिस्थिती लक्षात घेऊन नागपूरसाठी एक नवा मास्टर प्लॅन तयार करावा.
तसेच स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम मधील उणिवा दुरुस्त कराव्या, अशी मागणी ही विकास ठाकरे यांनी केली आहे. विशेष म्हणजे नागपुरात वारंवार उद्भवणाऱ्या पूर परिस्थिती संदर्भात नागरिकांच्या मदतीने सिटीजन पीटिशन करण्याची तयारी ही काँग्रेसने सुरू केली आहे. त्यासाठी नागरिकांनी 0712-7191232 या नंबर वर मिस्ड कॉल द्यावे, असे आवाहनही काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आहे.
....तर संबंधित कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
रस्त्यावरील बांधकामाच्या वेळेला कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहन चालकाचा अपघात झाला, किंवा त्यात कुणाचा जीव गेला तर संबंधित कंत्राटदारांविरोधात गुन्हे दाखल केले जातील. असा इशारा नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा कंत्राटदारांना दिला आहे. कंत्राटदारांनी निर्माण स्थळी त्यांच्या कामामुळे कोणत्याही वाहन चालकाचा अपघात होणार नाही, वाहन चालक जखमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. बांधकाम स्थळी बांधकामाचे साहित्य व्यवस्थित पद्धतीने ठेवावे. जर कंत्राटदराच्या निष्काळजीपणामुळे नागपुरात कोणत्याही वाहन चालकाचा जीव गेला. तर संबंधित कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या