(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Thackeray Meets PM Modi : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात वैयक्तिक भेट होणार?
CM Thackeray Meets PM Modi : मराठा आरक्षण प्रश्नी शिष्टमंडळाच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून पंतप्रधान मोदी यांची वैयक्तिक भेट घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील सूत्रांनी ही माहिती दिली. दह मिनिटांची ही भेट असू शकते.
नवी दिल्ली : आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेणार आहेत. अशातच या अधिकृत भेटीनंतर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मोदींची वैयक्तिक भेट घेऊ शकतात, अशी माहिती शिवसेनेच्या सुत्रांकडून एबीपी माझाला मिळाली आहे.
शिवसेनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या वैयक्तिक भेटीची इच्छा पंतप्रधान कार्यालयाकडे व्यक्त केली होती. मराठा आरक्षण आणि राज्यातील इतर प्रश्नांबाबात राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री आणि शिष्ठमंडळासोबतच्या मोदींची भेट पार पडल्यानंतर दहा मिनिटांची वैयक्तिक भेट असावी, असा आग्रह मुख्यमंत्र्याचा आहे. महत्त्वाचं म्हणजे, अशा प्रकारच्या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयानं वेळ दिली तर देशासह राज्याच्या राजकारणातही अनेक चर्चांना उधणा येणार आहे. तसेच या भेटीमुळे अनेक तर्क-वितर्कांना वाव आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे शिवसेनेचे सर्वेसर्वा आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे भाजपचे सर्वोच्च नेते आहेत. यांच्यादरम्यान जर वैयक्तिक भेट होत असेल, तर निश्चितपणे राजकीय चर्चा होणार, असल्याचं म्हटलं जात आहे. कारण बऱ्याच वर्षांपासूनची युती तोडत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र येत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरुच आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दोन पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये जर वैयक्तिक भेट झाली तर या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त होत आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Modi) भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर असं शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झालं आहे. मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाचा ताफा भेटीसाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचला आहे.
मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्यपालांच्या माध्यामतून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करत राज्यपालांना पत्र दिलं होते. तसेच भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होते.