9 February Headlines: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस, बुलेट ट्रेनच्या याचिकेवर सुनावणी; आज दिवसभरात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनबाबत आज हायकोर्ट फैसला सुनावणार आहे. गोदरेजनं विक्रोळीतील जमीन अधिग्रहणाला आव्हान देत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच आज युवासेना नेते आदित्य ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असून माजी मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात ते सभा घेणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 60 वा वाढदिवस
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. वाढदिवसानिमीत्त मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात अनेक कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे. ठाण्याच्या कोपरी पुलाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घघाटन होणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम :
- आज दुपारी 1.30 वाजता एमएमआरडीएनं बांधलेल्या कोपरी ब्रिजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
- टेंभी नाका येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लहान मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खेळाच्या साहित्याचं वाटप केल जाणार आहे.
- मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या लिगल सेलचे उद्घाटन.
- त्यानंतर दुपारी मुख्यमंत्री वर्षावर जातील, तिथेही वाढदिवस साजरा केला जाणार.
आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरू आहे. आज आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा चौथा आणि शेवटचा दिवस आहे. आज आदित्य ठाकरेंची तोफ मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात धडाडणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसैनिक आणि नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत.
बुलेट ट्रेनला मिळणार का हिरवा कंदील?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनबाबत आज हायकोर्ट फैसला सुनावणार आहे. गोदरेजनं विक्रोळीतील जमीन अधिग्रहणाला आव्हान देत हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्ट आज आपला अंतिम निकाल देणार आहे. गोदरजेच्या याचिकेला राज्य सरकारनं जोरदार विरोध केला होता. केवळ गोदरेजच्या आडमुठे भूमिकेमुळंच हा बहुउद्देशीय लोकोपयोगी प्रकल्प रखडल्याचा राज्य सरकारचा दावा आहे.
यवतमाळमध्ये ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. कापसाला प्रति क्विंटल 10,000 हमीभाव जाहीर करून त्वरित खरेदी चालू करावी, सोयाबीनला प्रति क्विंटल 7,000 रुपये हमीभाव जाहीर करावा, हरभरा आणि तुरीची नाफेडमार्फत ऑनलाईन नोंदणी करून खरेदी त्वरित सुरु करावी अशा मागण्यासाठी आज दुपारी 12 वाजता जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
नगर जिल्ह्याच्या नामांतरासाठी यांची रथयात्रा
अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करावे ही मागणी घेऊन आजपासून चौंडी येथून एक रथयात्रा सुरू होणार आहे. रथयात्रेची सुरूवात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते सुरू होण्याची शक्यता आहे. सकाळी 10 वाजता यात्रेला सुरूवात होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने या यात्रेचे नियोजन करण्यात आलंय. कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, नगर शहर असा प्रवास करीत सोमवारी 20 फेब्रुवारीला या रथयात्रेचा नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चेने समारोप होणार आहे. या रथयात्रेमुळे पुन्हा एकदा नगरच्या नामांतराचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.