(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde : आमच्यावर टीका करणाऱ्या अनिल देशमुखांच्या काळात राज्यात लाडका डान्सबार सुरू होता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपला काळ लक्षात घेतला पाहिजे, त्यांच्या काळात राज्यात लाडका डान्सबार सुरू होता. अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
Maharashtra News : राज्य सरकारने राज्यातील आमच्या लाडक्या भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सारखी अतिशय महत्वाकांक्षी योजना आणली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील लाखों महिला- भगिनींना होणार आहे. मात्र विरोधक सतत लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाल्याने निराशेच्या खाईत गेले आहेत. ते लाडकी बहीण काढली आता लाडका भाऊ कधी काढणार? आता लाडका शेतकरी काढा, अशी टिंगल विरोधक करत आहे. मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकर्यांच्या व्यथा आम्हाला समजतात, शेतकर्यांसाठी अनेक योजना या महायुती सरकारने केलेले आहेत. किंबहुना शेतकरी आमचा मायबाप आहे.
त्यामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केलेलं वक्तव्य हे चुकीचे आहे. त्यांनी आपला काळ लक्षात घेतला पाहिजे, त्यांच्या काळात राज्यात लाडका डान्सबार सुरू होता. लाडका डान्स बार नंतर पुढे काय काय झालं, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मला तुम्हाला फार काही सांगायची गरज नाही, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अनिल देशमुखांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जोरदार पलटवार केलाय
बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर अशा फेऱ्या माराव्या लागतात
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरुनही मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बाळासाहेब असताना एक त्यांचा एक दबदबा होता. अख्खी दिल्ली बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला महाराष्ट्र यायची. मात्र आजचे चित्र हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. आम्हाला जे तुम्ही म्हणत होतात दिल्लीश्वरांसमोर आम्ही लोटांगण घालतो, मग हे आहे ते काय आहे? हे लोटांगण आहे की अजून काय आहे? असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केलाय. बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर अशा प्रकारे चक्रा आणि फेऱ्या माराव्या लागतात असेही ते म्हणाले.
ठाणे हा धर्मवीर आनंद दिघे यांचाच बालेकिल्ला- एकनाथ शिंदे
ठाणे हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. दिघे साहेबांचा गड आम्ही लोकसभेत राखला. ठाणे उबाठा गटासाठी गड हा खालसा झाला आहे. त्यामुळे ते आता त्याच्यात जीव काय भरणार. त्यांनी आता त्यांचा मोर्चा दुसरीकडे वळवावा, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलेही काम करत नाही. मात्र, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना ठाणे आठवले आहे. परिणामी, निवडणुका या कधीही होऊ द्यात, या महाराष्ट्रातली जनता आमच्यावरच शिक्कामोर्तब करेल, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केलाय. ते शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना बोलत होते.
हे ही वाचा