CM Eknath Shinde: भाजप-शिवसेना येत्या निवडणुकीत 200 आमदार निवडून आणणार; मुख्यमंत्र्यांचा दावा
भाजपचे 115 आमदार आहे आणि शिवसेनेचे 50 आमदार आहेत मात्र आम्ही दोघंमिळून येत्या निवडणुकीत 165 आमदारांचे 200 आमदार निवडून आणू, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे

CM Eknath Shinde: भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना फक्त हिन्दुत्वाच्या विचारावर एकत्र आली आहे. दोन्ही पक्षाचा काहीच स्वार्थ नाही. आमच्या दोघांचा पक्ष हिन्दूत्वाचा मार्गाने चालतो. आज भाजपचे 115 आमदार आहे आणि शिवसेनेचे 50 आमदार आहेत मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही दोघंमिळून येत्या निवडणुकीत 165 आमदारांचे 200 आमदार निवडून आणू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दर्शवला आहे. आम्ही जर 200 आमदार निवडून आणले नाही तर मी शेतात जाऊन शेती करेन, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी मी मुख्यमंत्री होणार अशा चर्चा होत्या मात्र पवारांच्या सांगण्यावरुन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आलं. मला पदाची किंवा सत्तेची लालसा नाही. लालसेपोटी मी बंडखोरी केली नाही. मला बाळसाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार पुढे न्यायचे होते आणि अर्थात जनतेची निस्वार्थपणे सेवा करायची होती त्यामुळे मी बंडाचं पाऊल उचललं. मी मंत्री असताना अनेकांंनी माझ्या कामात अडथळे आणले. अनेकांनी हस्तक्षेप केला मी मात्र चकार शब्द काढला नाही. शिवसेनेचाच होतो आणि शिवसेनेचाच राहीन, असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षाला टोलाही लगावला
शिवसेना आणि भाजपचे सरकार पुन्हा आले आहे. माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेना व इतर अपक्षांचे 50 आमदार सोबत होते. माझ्यावर विश्वास ठेवून साथ दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. विरोधी पक्षातून सत्तेकडे जातात, असं दिसून येतात. मात्र, आम्ही सत्तेतून विरोधात गेलो. महाराष्ट्रातील सत्तांतर ही ऐतिहासिक घटना आहे. या घटनेची देशाने नव्हे 33 देशांनी दखल घेतली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्याकडून तीन मोठ्या घोषणा
एकनाथ शिंदेच्या भाषणाच्या समारोपावेळी 3 मोठ्या घोषणा केल्या. त्यात हिरकणी गाव वाचवण्याकरता 21 कोटींचा निधी मंजूर केला. पेट्रोल-डिजेलवरील वॅट कमी करण्याचा निर्णय नवं सरकार कॅबिनेटमध्ये लवकरच करणार असल्याचं सांगितलं आणि शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करु, असंही ते म्हणाले























