(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोल्हापूरमधील नंदवाळ येथे रिंगण सोहळ्यात पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की, पोलिसांकडून सौम्य लाठीमार
कोल्हापूरमधील नंदवाळ येथे रिंगण सोहळ्यात पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला.
Kolhapur News Update : कोल्हापूर येथील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ (ता. करवीर) येथे रिंगण सोहळ्यात भारत बटालियनच्या पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला असून पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्कीही झाल्याची माहिती समोर आली आहे. आरक्षित जागेवर रिंगण सोहळा करण्यावरुन हा वाद झाला असल्याची माहिती मिळत आहे. हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने नंदवाळमध्ये या रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर वाद निवळला आहे. परंतु, नंदवाळमध्ये अद्याप तणावाचं वातावरण आहे.
कोल्हापुरातील नंदवाळ या गावाला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. याच नंदवाळमध्ये दरवर्षी हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे यंदाही या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहानिमित्ताने नंदवाळमध्ये रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, हा रिंगण सोहळा भारत बटालियनच्या आरक्षित जागेत करण्याचा वारकऱ्यांचा आग्रह होता. परंतु, रिंगण सोहळ्याला भारत बटालियनने विरोध केला. यातूनच वारकरी आणि भारत बटालियनच्या पोलिसांमध्ये वाद झाला. त्यातून पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली.
भारत बटालियनच्या राखीव मैदानावर रिंगण सोहळा आयोजित करण्यास बटालियनच्या पोलिसांनी विरोध केल्यानंतर नंदवाळ गावातील नागरिकांनी त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये चर्चा सुरू असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. यातूनच नागरिक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, पोलिसांचे सुरक्षा कडे तोडून नागरिकांनी बटालियनच्या आरक्षित जागेवर जाऊन पालखी सोहळा पार पाडला.
दरम्यान, या वादानंतर गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी या प्रकरणावर मार्ग काढू असं म्हटलं आहे. "नंदवाळच्या नागरिकांसोबत चर्चा करण्यासाठी मी वैयक्तिक त्यांना भेटणार आहे. नागरिकांना भेटून या वादाबाबत मार्ग काढण्यात येईल, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या