रत्नागिरी : कोरोनाला संपवण्यासाठी आता सर्वच जण मैदानात उतरले आहेत. यावेळी शासनस्तरावर देखील मोठे आणि महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशातील जनतेनं उत्फूर्त प्रतिसाद दिला. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 144 कलम लागू केलं आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत राहिल याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. रविवारच्या जनता कर्फ्यूला कोकणवासियांनी, रत्नागिरी जिल्ह्याच्या जनतेनं देखील उत्फूर्त पाठिंबा दिला.


दरम्यान, रविवारचा जनता कर्फ्यू जिल्ह्यात यशस्वी झाल्यानंतर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यावेळी लोकांनी घोळक्यानं किंवा गटागटानं रस्त्यावर फिरू नये असं आवाहन त्यांनी केले आहे. शिवाय, लोकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा हा घरपोच होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी दिली. त्याकरता काही पुरवठादारांशी चर्चा सुरू असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाची आता सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच असा निर्णय घेणारा रत्नागिरी हा पहिलाच जिल्हा ठरला. शहरी भागात ही सुविधा मिळणार आहे. ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकानं सुरू असली तरी नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तर, जिल्ह्यातील खासगी बससेवा पूर्णता बंद असल्याची माहिती देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल त्यांनी जिल्ह्यातील जनतेचे आभार देखील मानले.


'त्या' लोकांवर विशेष ठेवणार


सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यातून गावी येणाऱ्यांची संख्या देखील तुलनेत मोठी आहे. त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. कोरोनाविरोधात लढण्यासाठी 1 हजार बेड्स या विविध रूग्णालयांमध्ये आरक्षित आहेत. परदेशातून आलेल्या व्यक्तींवर देखील लक्ष आहे. जवळपास 230 जण सध्या जिल्ह्यात होम क्वारंटाईन असून 11 जण जिल्हा रूग्णालयात क्वारंटाईन असल्याची माहिती देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर गेलेली नसून खबरदारीचा उपाय म्हणून या साऱ्या गोष्टी केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. तसेच केवळ शासनाकडून किंवा जिल्हा प्रशासनाकडून आलेली माहिती अधिकृत असेल, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.


'...अन्यथा गुन्हे दाखल करणार'


राज्यासह जिल्ह्यात कलम 144 लागू आहे. नागरिकांनी नियमांचं पालन करावं. कोणत्याही कामासाठी घरातील केवळ एकाच व्यक्तीनेच बाहेर पडावे. एकापेक्षा जास्त व्यक्तींनी घराबाहेर पडल्यास त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक विशाल गायकवाड यांनी दिली.


प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक


एकंदरीत रविवारी जनता कर्फ्युमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचे नागरिकांनी कौतुक केले. पोलीस यंत्रणा, ट्रॅफिक पोलीस, आरोग्य यंत्रणा यांच्याबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


संबंधित बातम्या