Chitra Wagh on Sanjay Rathod : संजय राठोडांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी, चित्रा वाघ यांचा संताप; म्हणाल्या...
Chitra Wagh on Sanjay Rathod : माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं अत्यंत दुदैवी, तरीही माझा लढा मी सुरूचं ठेवलाय, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
Chitra Wagh on Sanjay Rathod : संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) नाराज झाल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिपद दिलं जाणं दुर्दैवी असल्याचं चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. संजय राठोडांविरोधात माझा लढा सुरुच ठेवलाय, असंह चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
पुण्यातील तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी गेले वर्षभर चोहीकडून होणारे आरोप, ठाकरे सरकारमध्ये असताना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची लॉटरी लागलीय. राठोड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या आणि आरोपांची राळ उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या मंत्रिपदावर नाराजी व्यक्त केलीय. राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं दुर्दैवी असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटलंय. तसंच राठोड यांच्याविरोधात लढा सुरुच ठेवणार असून ही लढाई जिंकणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय. ट्विटरवर मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करत वाघ यांनी राठोड यांच्या मंत्रिपदावर उघड नाराजी व्यक्त केलीय..राज्यात सत्तांतर झाल्यानंतर संजय राठोड यांना पुण्यातील तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी क्लिनचीट मिळाली आणि नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंत्रिपदाचीही संधी दिलीय. मात्र यावरुन आता वादाची शक्यता आहे..
चित्रा वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेले असले तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे."
पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 9, 2022
संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे
माझा न्याय देवतेवर विश्वास
लडेंगे….जितेंगे 👍 @CMOMaharashtra
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील एका 22 वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. बीड जिल्ह्यातील 22 वर्षीय तरूणी अभ्यासासाठी पुण्याला रहायला आली होती. इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी ती भाऊ आणि मित्रासोबत राहत होती. ती पुण्यातील वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. सोशल मीडियात विशेषत: टिकटॉक अॅपमुळं ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. 7 फेब्रुवारीच्या रात्री तिनं पुण्यातील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका कॅबिनेट मंत्र्याचा संबंध असल्याचं वृत्त समोर आलं आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. ते नाव होतं, संजय राठोड यांचं.
पाहा व्हिडीओ : संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झाला असला तरी माझा लढा सुरुच राहील, चित्रा वाघ का म्हणाल्या असं?
या संदर्भात सोशल मीडियावर दोन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. यात पुजा, तिचा मित्र आणि संबंधित मंत्र्यांचं संभाषण आहे. संभाषणाच्या भाषेवर त्यांच्यात नेमके काय संबंध होते? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तरुणीच्या कुटुंबियानं सर्व दावे फेटाळत तिनं मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. शिवाय, आमच्याकडं कोणाच्याही विरोधात तक्रार आली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र, या प्रकरणी एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळं यावरून राजकारण रंगलं होतं. त्यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. तसचे, संजय राऊत यांच्याविरोधात टीकेची झोड उठवली होती. त्यावेळी महाविकास आघाडीत मंत्री असलेल्या संजय राठोड यांना आपलं मंत्रिपद सोडावं लागलं होतं.
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात संजय राठोड यांचा समावेश
शिंदे-फडणवीस सरकारच मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. राजभवनात एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी शिंदे गटाकडून संजय राठोड यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ घालण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अब्दुल सत्तार, उदय सामंत, दीपक केसरकर यांचीही मंत्रिमंडळ पदी वर्णी लागली आहे.