एक्स्प्लोर
एसीच्या युनिटमधून विजेचा धक्का, नागपुरात चिमुरड्याचा मृत्यू
हाताच्या कोपऱ्याचा एसीच्या आऊटडोर युनिटला स्पर्श झाल्यामुळे जोरदार करंट लागून सात वर्षांचा समीर मुन्शी पडला.

नागपूर : नागपुरात स्प्लीट एसीच्या आऊटडोअर युनिटमुळे वीजेचा धक्का लागून सात वर्षांच्या चिमुरड्याला प्राण गमवावे लागले. राहत्या घराच्या गच्चीवर खेळताना शॉक बसल्याने समीर मुन्शीचा जागीच मृत्यू झाला. नागपूरच्या कुशीनगर भागात हुडको कॉलनीमध्ये सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुन्शी कुटुंबीयांच्या घरी पहिल्या मजल्यावरील बेडरुममध्ये पॅनसॉनिक कंपनीचा स्प्लीट एअर कंडिशनर आहे. त्याचं आऊटडोर युनिट दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवर आहे. शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी गरम होत असल्यामुळे समीरने एसी सुरु केला. थोड्या वेळानंतर आईला न सांगताच तो खेळायला गच्चीवर गेला. त्यावेळी त्याच्या हाताच्या कोपऱ्याचा आऊटडोर युनिटला स्पर्श झाला. त्यामुळे जोरदार करंट लागून तो भिंतीवरील आऊटडोर युनिट आणि भिंतीच्या मध्ये पडला. विजेचा अत्यंत जोरदार झटका बसल्यामुळे समीरच्या नाका-तोंडातून रक्त आलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सुमारे एक ते दीड तास कुटुंबीयांना याविषयी समजलंच नाही. ट्यूशनची वेळ झाल्यानंतरही समीर न दिसल्यामुळे त्याची शोधाशोध सुरु झाली. काही वेळानंतर दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवर समीरचा मृतदेह आढळून आला. मुन्शी कुटुंबीयांना काही महिन्यांपूर्वी हे सेकंड हँड घर खरेदी केले होतं. घराची वायरिंग नीट नसल्यामुळे ही घटना घडल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
आणखी वाचा























