CM Fellowship : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत फेलोंना आयआयटी मुंबईचे प्रशिक्षण लाभणार, कसे असेल स्वरुप?
Chief Minister Fellowship 2025 : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दरवर्षी अधिक प्रगल्भ होत असून त्यात सहभाग घेणाऱ्या तरुणांना मोठा फायदा होताना दिसत आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन आणि आयआयटी मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात सहभागी तरुणांना विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम दिला जाणार आहे.
या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक विकासाशी निगडित प्रश्न समजून घेणे आणि त्यावर प्रभावी उपाय शोधण्यासाठी आवश्यक शास्त्रीय दृष्टिकोन, विश्लेषणात्मक साधने आणि व्यावहारिक प्रशिक्षण फेलोंना दिले जाणार आहे. यामुळे फेलोंच्या कार्यक्षमतेत आणि व्यावसायिक कौशल्यात लक्षणीय वाढ होईल.
शैक्षणिकदृष्ट्या सक्षम आणि सामाजिक भान असलेल्या युवकांना शासन व्यवस्थेशी जोडणे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. विविध पार्श्वभूमीतील तरुण शासनासोबत काम करताना नवदृष्टीकोनातून धोरणनिर्मिती व अंमलबजावणी प्रक्रियेला नवा आयाम देतात.
सन 2015 पासून सुरू असलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दरवर्षी अधिक प्रगल्भ होत असून, आयआयटी मुंबईसारखी नामांकित संस्था, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासोबत जोडली गेल्यामुळे फेलोशिपमध्ये सहभागी तरुणाईला त्यांच्या जीवनात व करिअरमध्ये निश्चितच फायदा होईल.
फेलोंसाठी प्रस्तावित अभ्यासक्रमाचे स्वरूप:
✅आयआयटी मुंबईमध्ये 20 दिवस प्रत्यक्ष वर्ग प्रशिक्षण
✅वर्षभरात 90 तास ऑनलाईन शिक्षण
✅आयआयटीचे ज्येष्ठ प्राध्यापक, निवृत्त सनदी अधिकारी आणि तज्ज्ञांबरोबर थेट संवाद
यावेळी आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे, उपसंचालक प्रा. मिलिंद अत्रे तसेच संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
फेलोशिपचे उद्दिष्ट
सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवकांना महत्त्वपूर्ण अनुभव मिळवून देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. युवकांमध्ये नेतृत्त्वगुण विकसीत करण्यासोबतच त्यांच्यात प्रशासकीय कामकाजाची जाण निर्माण करणे व भविष्यात सार्वजनिक क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांना तयार करणे ही या मागे उद्दिष्टे आहेत.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनासोबत काम करण्याची अनोखी संधी राज्यातील तरूणांना मिळणार आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या अखत्यारीत अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या प्रशासकीय कामाचा अनुभव या विद्यार्थ्यांना भविष्यात खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रात काम करताना उपयोगी पडेल. युवकांमधील उत्साह, उमेद तसेच त्यांच्याकडील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा उपयोग लोकहितासाठी करण्याच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फेलोशिप योजनेत 21 ते 25 वर्षे वयाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर तरूणाला सहभागी होता येणार आहे. त्यासाठी तो किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असला पाहिजे.
ही बातमी वाचा:






















