...तर तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना प्रश्न
Chief Minister Eknath Shinde On Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या घटनाबाह्य सरकार या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.
मुंबई : राज्याचं अर्थसंकल्पीय अधीवेशन सुरू आहे. यात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या घटनाबाह्य सरकार या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. "तुम्ही घटनाबाह्य सरकार म्हणत आहात तर तुम्हीही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना विचारला आहे. विधासभेत भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"दादा आपण सर्व एकत्रित काम करतोय, त्यामुळे घटनाबाह्य असं परत बोलू नका. जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेते व्हायचं होतं परंतु अजित पवार झाले. पहाटेची शपथ घेताना तुम्ही जयंत पाटील यांना विश्वासात घेतलं नाही. आता तर अजित दादा शिवसेनेचे प्रवक्ते असल्यासारखे झाले आहेत. दादा त्यांना काही तरी शिल्लक ठेवा बोलायला. अजित दादांनी वर्षा बंगल्यावरील चहापानाचा खर्च काढला. तुम्ही म्हणाले की सोन्याचं पाणी आहे का? दादा सोन्याचं पाणी नाही पण सोन्यासारखी माणसं माझ्याकडे येतता. त्यांना चहा पाजायला नको का? अडीच वर्षात कोविड होता. त्यामुळं कोण तिकडे जात नव्हतं. ऑनलाइन मिटींगला फेसबुकवरून लाईव्ह करून देखील चहापानाचा खर्च झालाय, असा टोला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "घटनेनुसार आम्ही सरकार स्थापन केलं. या देशात घटना आहे, लोकशाही प्रमाणे आम्ही काम करत आहेत. एकही चुकीचं काम करत नाही. बाकीचे काय बोलतात त्यावर आम्ही बेलत नाही. कालच्या निवडणुकीसंदर्भात तुम्ही बोलला. मी तर खुलेआम फिरलो. शरद पवार यांनीही सभा घेतल्या. अजित दादा तुम्ही गाड्या बदलून फिरत होते. त्याचे फोटोही आमच्याकडे आहेत. कसब्यात ज्या चुका झाल्या त्या सुधारु, पण चिंचवडमध्ये काय झालं? तीन राजयात काय झालं तुम्हाला माहीत आहे. भारत जोडो केला आणि तीन राज्य हरले."
"रामदास आठवले यांच्या पक्षाचे आमदार निवडून आले. तुम्ही निवडणूक आयोग की लोकसेवा आयोग म्हणालात. पण निर्णय महत्वाचा आहे, आम्ही तो निर्णय दिला. मी असं काही बोललो नाही की मला यशवंतराव यांच्या समाधी वरती आत्मक्लेश करावा लागेल, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील टीका केली. "तुम्ही थेटरमध्ये जाऊन जर लोकांना मारहाण कराल तर कसं जमेल. तुमच्या प्रकरणाची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. मोठ्याने बोलला म्हणून सत्य लपत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
पुढील दोन वर्षांत मुंबईत एकही खड्डा दिसणार नाही
"पुढील दोन वर्षांत एकही खड्डा दिसणार नाही, खड्डेमुक्त मुंबई करू. आता रिपेअरची काम बंद झाली. त्यामुळे परत टीका सुरु झाली आहे. मी जर सह्या केल्या नसत्या तर पुन्हा म्हणाले असते यांच्या पेनावर लकवा मारला का? आधी तर त्यांच्या खिशाला पेनच नव्हता, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.