26 November : उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार, मुख्यमंत्री शिंदे आमदारांसह गुवाहाटीला जाणार, आज दिवसभरात
Todays Headline 26 November : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुलढाण्यातील चिखली येथे दुपारी शेतकरी मेळावा व जाहीर सभा होणार आहे.
मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुलढाण्यातील चिखली येथे दुपारी शेतकरी मेळावा व जाहीर सभा होणार आहे. आज दुपारी 3 वाजता ही सभा सुरु होईल. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विदर्भातील जिल्ह्यात येत आहेत. याच जिल्ह्यातील दोन आमदार व खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
बाळासाहेबांची शिवसेना गुवाहाटीत
आज सकाळी 26/11 च्या वीरांना आदरांजली वाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार आणि खासदारांसह गुवाहाटीसाठी रवाना होतील. सकाळी 8 वाजता सगळे आमदार, खासदार विमानतळावर दाखल होतील. सकाळी 10.30 वाजता एअर इंडियाच्या विशेष विमानानं मुख्यमंत्री आमदार, खासदार, त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी मुंबईहून उड्डाण करतील. 4 वाजता सगळे कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहचतील. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा केली जाईल. संध्याकाळी आसामचे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांची भेट नियोजित आहे. यावेळी इतर महत्त्वाच्या व्यक्तींना देखील मुख्यमंत्री भेटण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयात 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता सर्वोच्च न्यायालयात संविधान दिनाच्या सोहळ्यात सहभागी होतील. संविधान सभेने 1949 मध्ये भारतीय राज्यघटना स्वीकारल्यानिमित्त हा दिवस 2015 पासून संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ई-कोर्ट प्रकल्पांतर्गत विविध नवीन उपक्रमांचा प्रारंभ करतील. हा प्रकल्प न्यायालयांच्या आयसीटी अर्थात माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान सक्षमीकरणाद्वारे याचिकाकर्ते, वकील आणि न्यायपालिका यांना सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न आहे.
26/11 घटनेला 14 वर्षे पूर्ण, विविध कार्यक्रमांचं आयोजन
मुंबई- पोलीस आयुक्त कार्यालयात 26/11 रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना मानवंदना देण्यासाठी "अभिवादन संचलन कार्यक्रम" आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थिती राहून आदरांजली वाहणार आहेत, सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.
इस्रो आज 8 नॅनो उपग्रह आणि ओशनसॅट-3 प्रक्षेपित करणार
श्रीहरीकोटा- आज इस्रोचं थर्ड जनरेशन ओशनसॅट 3 सह 8 नॅनो सॅटलाईट लॉन्च होणार आहेत. हे सॅटेलाईट सकाळी 11.46 वाजता लॉन्च केले जातील.
शिवसेनेकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन
मुंबईत शिवसेनेकडून आयोजित रोजगार मेळाव्याला आदित्य ठाकरे, सचिन अहिर उपस्थित राहणार आहेत. बोरिवली येथे सकाळी 9 ते दुपारी 3 दरम्यान हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
संविधान दिवस निमित्त विविध कार्यक्रम
मुंबई- काँग्रेसतर्फे संविधान दिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी भाई जगताप, चरणसिंग सप्रा उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.
पुणे- संविधान दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून संविधान दौड आयोजित करण्यात आलीय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ होणार आहे.
वर्धा- संविधान दिनाचे औचित्य साधून आज भारतीय लोकशाही मोर्चाच्या वतीने संविधान सन्मान पदयात्रेच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात नयी तालीम सेवाग्राम येथून करण्यात येणार आहे. या संविधान सन्मान पदयात्रेत जिल्ह्यातील अनेक गांधीवादी कार्यकर्ते सहभागी होणार असून पदयात्रेच्या माध्यमातून संविधान आणि हक्कांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. सकाळी 10 वाजता.
अकोला- संविधान दिनानिमित्त सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने वॉक फॉर संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता.
यवतमाळ- संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, सकाळी 11 वाजता.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला 2 वर्ष पूर्ण, मोदी सरकारने आश्वासनांची पूर्तता न केल्याने भारतीय किसान सभेच्या वतीने निदर्शने
अहमदनगर - दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी 376 दिवस केलेल्या आंदोलनाला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. हे आंदोलन मागे घेण्यासाठी मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने अहमदनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निदर्शने केली जाणार आहेत. सकाळी 11 वाजता.