मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा! दिग्गज नेत्यांच्या गाठी भेटी, कोणसोबत नेमकी काय झाली चर्चा?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत.

Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman), जे पी नड्डा, राजनाथसिंग, शिवराजसिंग चौहान यांच्या भेटी घेतल्या आहेत. सीतारामन यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील विविध आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून सहकार्य मिळणाऱ्या प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तबद्ध कारभाराचे केंद्रीय अर्थमंत्री यांनी कौतुक केले आहे. त्यांनी आर्थिक व्यवहार विभागाला (DEA) पुढील बहुवर्षीय प्रकल्पांचे मंजुरीसाठी निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी प्रकल्प कोणते?
1) मुख्यमंत्री ग्राम सडक योजना : 1 अब्ज डॉलर्स (ADB) राज्यातील 1000 हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना मुख्य रस्त्यांशी जोडणाऱ्या या योजनेमुळे लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी बळकट होणार आहे.
2) महाराष्ट्र-सागरी किनारपट्टी लवचिकता आणि अर्थव्यवस्था बळकटीकरण प्रकल्प (M-SHORE) - 500 दशलक्ष डॉलर्स (World Bank) समुद्रपातळी वाढीच्या पार्श्वभूमीवर, निसर्गाधारित उपायांचा वापर करून किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे.
3) महाराष्ट्र अर्बन जलसंधारण व पुनर्वापर कार्यक्रम - 500 दशलक्ष डॉलर्स (World Bank)
शहरी सांडपाण्याचे 100 टक्के शुद्धीकरण करुन त्याचा औद्योगिक वापरासाठी पुनर्वापर करण्याच्या उद्दिष्टाने या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत अनेक नेत्यांच्या घेतल्या भेटी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथसिंग, जे. पी. नड्डा, मनोहरलाल खट्टर, निर्मला सीतारामन, शिवराजसिंग चौहान, नीती आयोगात भेट घेतली आहे. गावांना सिमेंट रस्त्यांनी जोडणार, सांडपाणी प्रक्रिया, बांबू क्लस्टर, विदर्भात खतांचा प्रकल्प, एनसीडी स्क्रिनिंगसाठी एआय, अनेक प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीनं या भेटी घेतल्या आहेत.
अमित शहा आणि राजनाथसिंग यांची सदिच्छा भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनात सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राशी संबंधित विविध प्रकल्पांवर तसेच विषयांवर त्यांनी चर्चा केली. सुमारे 25 मिनिटे ही बैठक चालली. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री राजनाथसिंग यांचीही सदिच्छा भेट घेतली आणि विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर आणि हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत सदिच्छा भेट घेतली.
विदर्भात खताचा प्रकल्प, जे. पी. नड्डा यांच्याशी भेट
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या भेटीत विदर्भात एक खतांचा मोठा प्रकल्प उभारण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. नागपूर जिल्ह्यात गेल, फर्टिलायझर विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त उपक्रमातून हा 12.7 लाख टनाचा प्रकल्प असणार आहे. सुमारे 10,000 कोटींचा हा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पासाठी सबसिडी देण्याची मागणीही करण्यात आली आहे. यासंदर्भातील मंत्रिमंडळ प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना जे. पी. नड्डा यांनी दिल्या. फर्टिलायझर विभागाचे सचिव रजतकुमार मिश्रा यावेळी उपस्थित होते.
14,000 कि.मी.चे ग्रामीण रस्ते, शिवराजसिंग यांच्याशी भेट
महाराष्ट्रात 14,000 कि.मी.चे रस्ते तयार करण्यासाठीचा एक प्रस्ताव महाराष्ट्राने केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाकडे दिला आहे. हा एकूण प्रस्ताव 2.6 बिलियन डॉलर्सचा (सुमारे 22,490 कोटी रुपये) असून, यातच एडीबीचे सहाय्य घेण्यात येणार आहे. 25 वर्ष मेंटेनन्स फ्री या तत्त्वावर हे रस्ते उभारण्यात येणार आहेत. शेतकर्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरेल, यातून त्यांना चांगली कनेक्टिव्हीटी मिळेल, असे शिवराजसिंग चौहान यांनी सांगितले. या प्रकल्पाला मदत करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेत सर्वेक्षणाचे काम अतिशय गतीने केल्याबद्दल शिवराजसिंग चौहान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्रात देशात सर्वाधिक 30 लाख घरे केंद्र सरकारने मंजूर केली आहेत, हे याठिकाणी उल्लेखनीय.
नीती आयोगाची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रमण्यम आणि सदस्य राजीव गौबा यांची भेट घेतली. एफआरबीएम मर्यादा 25 टक्के असताना महाराष्ट्राने 18 टक्के इतकी ती राखल्याबद्दल नीती आयोगाने प्रशंसा केली. एनसीडी (नॉन कम्युनिकेबल डिसिज) स्क्रिनींगसाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर, बांबू आधारित क्लस्टर (हे दोन्ही प्रकल्प प्रत्येकी 500 मिलियन अमेरिकन डॉलर्सचे), मराठवाडा वॉटर ग्रीड आणि दमनगंगा-गोदावरी नदीजोड प्रकल्पासह अन्य जलसंधारण प्रकल्प (सुमारे 1 अब्ज अमेरिकन डॉलर्स) तसेच महाराष्ट्रातील आयटीआयला खाजगी उद्योगांशी जोडून कौशल्य प्रशिक्षणाचा कार्यक्रम इत्यादी प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा झाली आणि त्याचे सादरीकरण झाले. या प्रकल्पांच्या परवानग्यांना गती देण्यात येईल, असे आश्वासन निती आयोगाने दिले.

























