काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाची तीव्र निदर्शने, छत्रपती संभाजीनगरच्या क्रांतीचौकात रास्तारोको
मंगळवारी रात्री जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील जंगल परिसरात चार तासांच्या कालावधीत सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोनवेळा गोळीबार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली.
Chhtrapati Sambhajinagar: काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या (Kashmir terror Attack) निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली आहेत. शहरातील क्रांती चौकात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आलं असून सरकारच्या अपयशी धोरणामुळे जवानांना वीर म्हणून येत असल्याचा आरोप दानवे यांनी केला.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी क्रांती चौकात रास्ता देखो देखील करण्यात आला, यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून निदर्शने केली आहेत.
मंगळवारी काश्मीरच्या जंगल परिसरात चकमक
मंगळवारी रात्री जम्मू आणि काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील जंगल परिसरात चार तासांच्या कालावधीत सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दोनवेळा गोळीबार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. या चकमकीत चार लष्करी जवान शहीद झाले आहेत.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केले आहेत. यावेळी शहरातील क्रांती चौकात "काश्मीर है हिंदुस्थान का नही किसी के बाप का" अशी घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्यात आला आहे.
शहीद जवानांना श्रद्धांजली
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या. क्रांतीचौकात याबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जम्मू काश्मीरमध्ये सैन्य हाय अलर्टवर
जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ, राजौरी आणि सांबा जिल्ह्यात मंगळवारी संशयित दहशतवादी हालचालींनंतर सुरक्षा दलांनी जमीन आणि हवाई शोध मोहीम सुरू केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमेवर आणि मध्यभागी सैन्य आधीच हाय अलर्टवर आहेत.
बेटार नदीजवळ दोन लोकांच्या संशयास्पद हालचाली दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कर आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुप किंवा SOG यांनी शोध मोहीम सुरू केली.
काश्मीरमध्ये महिनाभरापूर्वीही दहशतवाद्यांनी केले होते नागरिकांना लक्ष्य
दरम्यान महिनाभरापूर्वी देखील काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसवर गोळीबार केला होता. त्यामुळे या हल्ल्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस दरीत कोसळली. या घटनेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले आहेत. बसमधील सर्व प्रवासी उत्तर प्रदेशमधील असल्याचं समोर आलेय. ही बस रियासीवरुन कात्राच्या दिशेने निघाली होती.