Chhagan Bhujbal: ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला नेत्यांची दांडी अन् भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले, 'बारामतीतून ऐनवेळी फोन आला म्हणून....;
Chhagan Bhujbal: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळवा पार पडला आहे. मेळाव्यात बोलताना भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाहीत त्यावरून शरद पवारांवर हल्लाबोल केला.
बारामती: आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या पक्षाचा मेळवा पार पडला आहे. या मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी बोलताना ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाहीत त्यावरून शरद पवारांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. शरद पवारांमुळे विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप करत भुजबळ म्हणाले की, राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी शरद पवारांना घेऊन या अशी विनंती जितेंद्र आव्हाडांकडे केली होती. राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी बैठकीला येणं अपेक्षित होते. पण बारामतीतून कुणाचातरी फोन आला आणि विरोधकांनी बहिष्कार टाकला, असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाचा मेळवा पार पडला आहे. या मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ बोलत होते.
काय म्हणाले छगन भुजबळ?
ओबीसी आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी उपस्थितीवरून बोलताना भुजबळ(Chhagan Bhujbal) म्हणाले, "विजय वडेट्टीवार यांना सांगितलं होतं तुम्ही देखील या बैठकीसाठी उपस्थित राहा. मी त्यांना कायदा काय सांगतो ते वेगवेगळ्या ॲडव्होकेट जनरल यांनी दिलेल्या कागदपत्रांच्या कॉपीस देखील त्यांना दिल्या. मी जितेंद्र आव्हड यांना देखील बोललो. त्यांनाही कायद्याच्या कागदपत्रांच्या काही कॉपी दिल्या. त्यांना सांगितलं काहीही करा पण शरद पवारांना देखील बोलवून घ्या. कारण व्हि.पी. सिंग यांनी जे आरक्षण दिलं, त्या आरक्षणाची अंमलबजावणी शरद पवारांनी केली. त्यामुळे आम्ही आत्तापर्यंत शरद पवारांचा जयजयकार केला. त्यांचे आभार देखील मानले. पंरतु आरक्षणाच्या बाबतीत जेव्हा काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळी अपेक्षा आहे की, महाराष्ट्राचे जेष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी देखील तिथे यायला हवं होतं. असं सांगितलं जातं कि, सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कोणाचा तरी फोन आला आणि विरोधी पक्षाचे जे नेते येणार होते त्यांनी बहिष्कार टाकला", असं म्हणत छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर नाव न घेता निशाणा साधला आहे.
ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय?
भुजबळ(Chhagan Bhujbal) पुढे म्हणाले, "या बारामती मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे मतदार आहेत, मीळी समाजाचे मतदार आहेत, धनगर समाजाचे मतदार आहेत. सर्व ओबीसी समाजाचे मतदार आहेत, भटक्या-विमुक्त समाजाचे मतदार आहेत, या सर्वांनी आपली मते जशी सुनेत्रा पवारांना दिली तशी ती सुप्रिया सुळे यांना देखील दिली त्या सर्वांचं संरक्षण करणं हे तुमचं काम नाही का असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजित पवारांवर असेल, तुमचा राग छगन भुजबळवर असेल. पण, या ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय असं म्हणत बैठकीसाठी तुम्ही का उपस्थित राहात नाही", असा सवाल उपस्थित केला आहे.
विरोधकांना पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि महाराष्ट्र पेटवायचा असा उद्योग सुरू असल्याचा थेट आरोप छगन भुजबळांनी बोलताना केला. ज्यावेळी निवडणूक येईल त्यावेळी तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची मांडू. पण राज्यातील सामाजिक प्रश्न पेटत असताना तुम्ही मुद्दामहून शांत का बसताय, ते सोडवण्यासाठी का येत नाही, बारामतीसह राज्यात राहणारे सर्वजण तुमचे आहेत आणि आमचेही आहेत, असंही छगन भुजबळ म्हणाले. राज्यातल्या सामाजिक प्रश्नांवर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावं आणि चर्चा करून हा प्रश्न सोडवावा असंही छगन भुजबळ यांनी पुढे म्हटलं आहे..