अजितदादा स्वार्थासाठी नाही तर विकासासाठी सत्तेत, कर्जतमधील शिबिरात छगन भुजबळांचा दावा
कोणत्याही आमदारांची घरं जाळणं चुकीचे आहे. हे एक षडयंत्र आहे या मागे कोण आहे हे शोधून काढले पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.
अजितदादा स्वार्थासाठी नाही तर विकासासाठी सत्तेत गेले आहे. गावपातळीवर मुळापर्यंत पक्ष रुजला पाहिजे. ,निवडणुकीतल्या यशामुळे जनताही पाठिशी असल्याचंही वक्तव्य छगन भुजबळांनी केले आहे. सगळेच एका बाजुला आले तर काय करायचं? विरोध कशासाठी?' असा सवाल देखील भुजबळांनी केला आहे.
भुजबळ म्हणाले, आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी, राज्यासाठी, जनतेसाठी त्यांच्यासोबत गेलो, स्वार्थासाठी नाही. शेतकऱ्यांचे, शहरातले, गावांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांच्यासोबत जावंच लागणार आहे. महाराष्ट्रातील जनता, पक्षाचे तमाम कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेनं दाखवून दिलं की, भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष अजितदादांचा राष्ट्रवादीच आहे. जनतेनं या मुद्द्यावर शिक्कामोर्तब केलं की आमचा निर्णय बरोबर आहे.
नाशिकमध्ये (Nashik Unseasonal Rain) प्रचंड पावसामुळे झालेल्या नुकसानमुळे शेतकऱ्यांना सांत्वन द्यायला गेलो. शेतकरी रडत होते. द्राक्षाच्या बागा विकल्या गेल्या. मात्र हार्वेस्टिंगच्या वेळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. एका शेतकऱ्याचं पन्नास लाखांचं नुकसान झाले, त्यांचे अश्रू पुसायला कुणीतरी जायला हवं होतं . तिथे आंदोलनं केली चले जाव म्हटलं. मी म्हणालो राजकारण बाजूला ठेवा. तर त्यांचं म्हणणं होतं की गावबंदी आहे, इतर वेळी राजकारण ठीक आहे. हे कोण करतंय हे आम्हाला माहिती आहे..काही ठराविक लोकांना प्रवेश असतो, ठराविक पक्षाच्या लोकांना प्रवेश असतो. संकटाच्या वेळी आपण जनतेचे अश्रू पुसणं आपलं कर्तव्य आहे, असे भुजबळ म्हणाले.
आमचे काय चुकले?
भुजबळ म्हणाले, आमचा पक्ष जुना आहे, 1999 मधे स्थापन झाला आहे. या पक्षाचा पहिला प्रांताध्यक्ष छगन भुजबळ इथेच आहे. आता सगळेच्या सगळे आमच्यासोबत आले तर आमची काय चूक आहे. तुमचंही हेच चाललं होतं. काल प्रफुल पटेल म्हणाले, त्यातल्या काही गोष्टी प्रफुलभाईंना माहिती आहे,अजितदादांना माहिती आहे. मला थोड्या माहिती आहे. तळ्यात मळ्यात असं करू नका, काय ते एकदा ठरवा... हे मी म्हणालो होतो. बरं, हे काही एकदा झालं नाही अनेकदा प्रयत्न झाला. पाच वेळा तेच ते काय चुकलं आमचे? असा सवाल छगन भुजबळांनी केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, आम्ही पूर्वीपासूनच शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत. मार्ग बदलला, मार्ग बदलला असा आरोप होतो. नितिशकुमार, जयललिता, नवीन पटनायक, महबूबा मुफ्ती हे सगळे भाजपसोबत गेले होते. त्यांची विचारसरणी बदलली का? आम्ही त्यांच्यासोबत गेलो म्हणजे आमची विचारधारा बदलली का? शिवसेना आणि भाजप हे एकत्रच होते. आता आम्ही त्यांच्यासोबत गेलो तुमच्या मनात 5-7 वेळा आलं होतं त्यांच्यासोबत जाण्याचं मात्र मन सारखं बदलत होतं.
अजित पवार मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार
शेतकऱ्यांच्या अवकाळी, दुष्काळ,शेतमालाचे भाव या सगळ्या अडचणी सोडवायचे आहेत. विकासाची कामं, रखडलेली कामं, अडचणीचे प्रश्न सोडवले जाता आहेत. राष्ट्रवादी कुणाची याची न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्याचाही निर्णय येईलच लवकर लोक जेव्हा दु:खात असतात, अडचणीत असतात तेव्हा लोकांसाठी काम करणं हे आपलं काम आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हायला पाहिजे असं म्हटलं तर ते म्हणतात अजितदादा मुख्यमंत्री होणारच नाही..तर ते शुभेच्छाही देत नाही.उलटंच सगळं करतात,,एवढा दुरावा का? आपण राजकारणातले विरोधक आहोत, शत्रू नाही..शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे. आपल्यासोबत जनतेच्या शुभेच्छा आहेत.जास्तीत जास्त आमदार, खासदार निवडून आणावे लागतील जेणेकरून आपलं हे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास छगन भुजबळांनी व्यक्त केला आहे.
कोणत्याही आमदारांची घरं जाळणं चुकीचे
मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे फक्त दुसऱ्या समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला नाही पाहिजे..शरद पवारही हेच बोलतात पण प्रत्येक जण आपापला वेगळा अर्थ काढतो आणि विरोध करतो. प्रकाश सोळंकेंच्या घराची अवस्था पाहिली असती तर डोळ्यात पाणी आलं असतं. कोणत्याही आमदारांची घरं जाळणं चुकीचे आहे. हे एक षडयंत्र आहे या मागे कोण आहे हे शोधून काढले पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.
राज्यात अशांतता असेल त्या राज्यात उद्योगधंदे येणार कसे?
राज्यात शांततेचे वातावरण आहे. अशांतता का निर्माण केली जात आहे. दगड, पिस्तुलं असली हिंसा कशाला पाहिजे. सर्व समाजातल्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्ती, ज्येष्ठ राजकारण्यांनी एकत्र या बसा आणि बोला.. कशाला कायदा हाती घ्यायचा त्यांच्याही काही मागण्या आहेत, त्यासाठी हिंसा कशाला? आम्ही कधीही जातिवाद केला नाही. राज्यकर्ता लहान मोठा सगळ्यांचा असतो. कुठल्या एका समाजाचा नसतो. कुणावर अन्याय होत असल्यास आवाज उठवावा, मात्र कायदा सुव्यवस्था बिघडू नये. ज्या राज्यात अशांतता असेल त्या राज्यात उद्योगधंदे येणार कसे? असा सवाल देखील छगन भुजबळांनी केला आहे.