Chandrayaan 3 Landing : आजचा दिवस आणि संध्याकाळी सहा वाजून  मिनिटांची वेळ, भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. कारण याच क्षणी भारताच्या भाळी ऐतिहासिक यशाचा टिळा लागणार आहे. याला कारण ठरतंय भारताची चांद्रयान-3 मोहीम चांद्रयान-3’ ही मोहीम यशस्वी  झाल्यानंतर चांद्रमोहीम यशस्वी करणाऱ्या चार देशांमध्ये भारताचं नाव गौरवानं घेतलं जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे‘इस्रो’च्या या मोहिमेमध्ये महाराष्ट्राचे मोलाचे योगदान दिले आहे. बुलढाण्यातील खामगावची चांदी, जळगावात तयार झालेलं एचडी वर्षा नोझल्स, सांगलीत रॉकेटच्या पार्ट्सचं कोटिंगचं काम सांगलीतील, पुण्यात फ्लेक्स नोजल आणि बूस्टर, जुन्नरच्या शास्त्रज्ञांचे योगदान आहे. त्यामुळे महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुलून आलीय. 


 चांद्रयान मोहिमेत बुलढाण्यातील खामगावचा वाटा 


सुमारे 615 कोटी रुपये खर्चून तयार केलेले हे मिशन सुमारे 40 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहे.  
भारताचं चांद्रयान-३ संध्याकाळी चंद्रावर लॅण्ड होणार आहे.  आनंदाची बाब म्हणजे भारताच्या या चांद्रयान मोहिमेत बुलढाण्यातील खामगावचाही वाटा आहे. चांद्रयान-३ मध्ये खामगावची चांदी आणि थर्मल फॅब्रिक्स वापरण्यात आलंय.
खामगाव ही देशाची रजतनगरी म्हणून ओळखली जाते. येथे शुद्ध चांदी मिळत असल्यानं चांद्रयान-३ मधील स्टर्लिंग ट्यूबमध्ये ही चांदी वापरण्याची आलीय, अशी माहिती खामगावचे प्रसिद्ध चांदीचे व्यावसायिक श्रद्धा रिफायनरी यांनी दिलीय. तर चांद्रयानाला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आवश्यक असणारा रबराईज्ड फॅब्रिक खामगावच्याच भिकमची फॅब्रिक्सने तयार करून त्याचा इस्रोला पुरवठा केला. 


सांगलीत GSLV MK III रॉकेटच्या पार्ट्सचं महत्त्वपूर्ण कोटिंगचं काम 


GSLV MK III रॉकेटच्या पार्ट्सचं महत्त्वपूर्ण कोटिंगचं काम सांगलीतील उद्योजक संदीप सोले यांच्या DAZZLE DYNACOATES PRIVATE LIMITED या फॅक्टरीत पार पडलं. ही बाब महाराष्ट्राची आणि त्याच बरोबर सांगलीकराची मान उंचावणारी आहे. गेली तीस वर्षे केवळ संरक्षण आणि अंतराळ संशोधन केंद्रासाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचे काम या कंपनीमध्ये होत आहे. या जीएसएलव्ही यानाचा एक भाग  सांगलीजवळील माधवनगरमध्ये असलेल्या डझल डायनाकोटस् या खासगी कारखान्यात तयार करण्यात आला आहे.  अंतराळ यानाला प्रक्षेपणानंतर जे इंधन आवश्यक आहे ते तयार करण्यात येणार्‍या भागाला संरक्षण आणि साठवण करणार्‍या उपकरणाची निर्मिती या कारखान्यात करण्यात आली 


 'चांद्रयान-3' मोहिमेत जुन्नरच्या दोन सुपुत्रांची  कामगिरी 


 देशातील प्रत्येकालाच या मोहिमेचा अभिमान आहे. मात्र यातच आपल्या लहान गावातून शिक्षण घेऊन श्रीहरिकोटा मध्ये झालेल्या उड्डाणापर्यंतचा प्रवास फार कठीण होता. मात्र गावातील या दोघांनी जिद्द ठेवून आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करुन जुन्नरकरांची मान उंचावली आहे.असिफभाई महालदार हे उद्योजक आहे. त्यांची रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनी आहे. त्यांच्या कंपनीला या मोहिमेसाठी सहा कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. ते मुळचे जुन्नर तालुक्यातील राजुरीत राहतात. चंद्रयान मोहिमेदरम्यान काही धोका झाला तर मोठी आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठी यंत्रणा तैनात ठेवावी लागते. ही अग्निशामक यंत्रणा असिफभाई महालदार यांच्या रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनीने पुरवली होती. श्रीहरिकोटा येथे ही यंत्रणा स्थापित करण्यात आली होती.  त्यासोबतच राजुरी गावातील मयुरेश शेटे हे इस्त्रोत शास्त्रज्ञ आहेत. या चांद्रयान मोहिमेत मोठा सहभाग आहेत. सिनियर सायंटिस्ट म्हणून शेटे काम पाहतात. त्यांनीदेखील मोठी मेहनत करत चांद्रयान-3 या मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यांचे वडिल राजुरीत प्राचार्य आहेत आणि मयुरेश यांचं प्राथमिक शिक्षण राजुरीतील शिक्षण विद्या विकास मंदिर येथे झालं आहे. 


वालचंद इंडस्ट्रीजमध्ये चांद्रयानला लागणारे बूस्टर बनवले 


चांद्रयान 3 ला लागणारे बूस्टर्स हे महाराष्ट्रात बनवले गेले आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर येथील वालचंद इंडस्ट्रीजमध्ये चंद्रयानला लागणारे हे बूस्टर बनवण्यात आले होते. बूस्टर सोबत चांद्रयान तीन चे फ्लेक्स नोजल देखील याच वालचंद इंडस्ट्रीज बनवण्यात आले होते. वालचंद इंडस्ट्री आणि इस्रो गेली 50 वर्ष सोबत काम करीत आहेत.  भारताने आजपर्यंत विविध उपकरणे ही अवकाशात पाठवली आहेत. त्यातील हार्डवेअर बनवण्यात वालचंद इंडस्ट्रीचा मोठा वाटा आहे. आतापर्यंत वालचंद इंडस्ट्रीने SLV 3, ASL ते PSLV, GSLV MKII, MKIII या प्रतिष्ठित मोहिमांसह मंगळयान, चंद्रयान-सारख्या प्रतिष्ठित मोहिमांसह इस्रोच्या सर्व कार्यक्रमांसाठी हार्डवेअरच्या श्रेणीचे उत्पादन वालचंद इंडस्ट्रीत बनविण्यात आले हाते. तसेच चांद्रयान 1, चांद्रयान 2 आणि आता चांद्रयान -3  मिशनच्या LVM3 प्रक्षेपण वाहनामध्ये वापरलेले बूस्टर सेगमेंट S200 हेड, एंड सेगमेंट, मिडल सेगमेंट आणि 3.2 मीटर व्यासाचे नोजल एंड सेगमेंट तयार केले गेले. 


हे ही वाचा :


Chandrayaan 3 : चांद्रयान 3 च्या लॅण्डिंगला उरले अवघे काही तास, क्षणाक्षणाचे अपडेट एका क्लिकवर