Marathwada Flood : शिंदे हे भावनिक नेते, मदतीमध्ये जाहिरातबाजी येऊ नये; मदत किटवरील फोटोबाजीवर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : या आधीही विरोधकांनी असाच प्रकार केला होता, मदत देताना सांगितलं 10 किलो आणि दिले एक किलो अशी परिस्थिती होती असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मुंबई : मराठवाड्यातील पूरग्रस्तांना (Marathwada Flood) देण्यात येणाऱ्या मदतीवरूनही आता राजकारण आणि प्रचार सुरू झाल्याचं दिसतंय. धाराशिवमध्ये पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे फोटो छापल्यानंतर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर आता महायुतीतील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. मला याबाबत नेमकी माहिती नाही, पण मदतीमध्ये कोणतीही जाहिरातबाजी येऊ नये असं बावनकुळे म्हणाले.
धाराशिवमध्ये देण्यात येणाऱ्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या फोटोवरुन संताप व्यक्त होत आहे. काही पूरग्रस्तांनी यावर नाराजी व्यक्त केली. त्यावरून विरोधकांनीही महायुती सरकारवर टीका केल्याचं दिसून येतंय. शिंदे हे भावनिक नेते आहेत, अशात त्यांनी काही केले असेल तर त्याची मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली.
Chandrashekhar Bawankule On Shine Help Kit : विरोधकांनी या आधी असंच केलं
या सगळ्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "घरात पाणी शिरले तर दोन-तीन महिने घर सेटल व्हायला लागतात. लोक काय खातील आणि कसे जगतील हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. अशात काहींची संताप होतो, आम्ही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहोत."
चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की, "या आधीही अनेकांनी असे फोटो लावलेत आहेत, काय काय कशी मदत केली होती विरोधकांनी हे सर्वांना माहिती आहे. मदतीत जाहिरातबाजी येऊ नये. पण विरोधकांनीही या आधी अशा जाहिराती केल्या होत्या. विरोधकांनी याआधी दाखवण्यासाठी अनेकदा मदत केली आहे. सांगितलं 10 किलो दिलं 1 किलो अशी परिस्थिती होती."
Pratap Sarnaik Dharashiv Help Kit : मदतीमध्ये जाहिरातबाजी येऊ नये
मदतीमध्ये जाहिरातबाजी येऊ नये. मदत ही सढळ हाताने करावी आणि दाखवण्यासाठी करण्यात येऊ नये. मतं मिळवण्याचा हा प्रसंग नाही. लोकांना आधार देण्याचे हे काम आहे. जाहिरातबाजी न करण्याची जबाबदारी आपली आहे. पुराच्या काळात मदतीमध्ये कोणतेही राजकारण येता कामा नये ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असं बावनकुळे म्हणाले.
Marathwada Flood : पंचनामे करून मदत करणार
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यातील पालकमंत्री हे पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी बांधावर पोहोचले आहेत. मराठवाड्यात मागील 50 वर्षात जितका पाऊस झाला नाही तितका पाऊस झाला. त्यामुळे मालमत्ता, शेती, जनावरांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी, ग्रामपंचायतपर्यंतचे प्रशासन ते एनडीआरएफ आणि एसडीआरएफ देखील काम करत आहेत. फिल्डवर राहा अशा सूचना पालकमंत्र्यांना दिल्या आहेत. मला सूचना आहेत की पंचनाम्यांकडे लक्ष द्या. पंचनामे झाल्याशिवाय मदत मिळत नाही."
खरडून गेलेल्या जमिनी आणि शेतीचं नुकसान यासाठी वेगवेगळे जीआर निघत आहेत. एखादी योजना कमी जास्त करता येईल, मात्र शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी देखील ठरवलं आहे. शेतकऱ्यांसाठी आमच्याकडे कमी पैसे नाहीत, शेतकरी अडचणीत असेल तर त्याला बाहेर काढलं पाहिजे ही आमची भावना आहे असं बावनकुळे म्हणाले.
ही बातमी वाचा:
























