चंद्रपूर : वाघ आणि गावकरी एकमेकांसमोर आल्याची आणि वाघाची आक्रमकता पाहून गावकऱ्यांनी माघार घेतल्याची चित्तथरारक घटना चंद्रपूर शहराजवळील भटाळी गावात उघडकीस आली आहे. काल दुपारी भटाळी गावाजवळ असलेल्या इरई नदी शेजारी वाघाने एका गाईची शिकार केली. या वेळी गुराख्याने आरडाओरड करून वाघाला पिटाळून लावले आणि गावात जाऊन लोकांना याची माहिती दिली. 


थोड्या वेळाने गावकरी घटनास्थळी आले मात्र इतक्या वेळात वाघ आपल्या शिकारीसाठी परत आला होता. गावकऱ्यांनी पुन्हा एकदा वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र गावकऱ्यांना पाहून वाघ अधिकच चवताळला. आणि त्यानं आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहताच गावकऱ्यांची भंबेरी उडाली. गावकऱ्यांनी त्यानंतर तिथून काढता पाय घेतला.   वनविभागाने परिसरातील गावांमध्ये सतर्कतेचं आवाहन केलंय. पुढचे काही दिवस वनविभाग या परिसरात शोधमोहिम राबविणार आहे. वाघाचं दर्शन झाल्याने जवळा परिसरात लोकांमध्ये दहशत पसरली आहे.


काही दिवसांपूर्वी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील एका वाघाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात हा वाघ वीज केंद्राच्या राख साठवण तलाव परिसरात मुक्तपणे फिरताना दिसला होता. इथे काम करणाऱ्या जेसीबीवरील कर्मचाऱ्यांनी हा व्हीडिओ शूट केलाय. वीज केंद्रातील विस्तीर्ण परिसरात सुमारे चार वाघांचं वास्तव्य आहे. त्याशिवाय बिबट्या-अस्वलं आणि वन्यजीवही इथे सातत्यानं वावरत असतात. 



महत्त्वाच्या बातम्या :