shirur vabalevadi innovative school : पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी गावातील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून निलंबित केले. वाबळेवाडीच्या ज्या शाळेची आणि त्यासाठी दत्तात्रय वारे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली त्याच दत्तात्रय वांरेना स्थानिक राजकारणातून निलंबनाला सामोरं जावं लागलय.  2012 मधे वाबळेवाडीतील शाळेत शिक्षक म्हणून रुजु झाल्यावर दत्तात्रय वारे यांनी लोकसहभागातून शाळेचा विकास करण्यास सुरुवात केली.  पुढे 2016 साली त्यांचे काम बघुन आर्ट ऑफ लिव्हिंग आणि बॅक ऑफ न्यूयॉर्कने शाळेसाठी निधी दिला आणि वाबळेवाडीत आदर्श शाळा उभी राहीली.  या शाळेत फळा किंवा बाकडी न ठेवता विद्यार्थ्यांना मुक्त शिक्षण देण्यावर भर देण्यात आला. यामुळे खाजगी शाळांमधे शिकणारे विद्यार्थीही वाबळेवाडीतील या शाळेकडे वळले आणि या शाळेत प्रवेश घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेटिंग लिस्ट लागू लागली.


वारे सरांच्या या कामाची दखल सर्वत्र घेण्यात आली आणि वाबळेवाडीतील शाळेसारख्या शाळा राज्यभरात उभारण्याची गरज अजित पवारांनी बोलून दाखवली होती. पण आता अजित पवारांच्याच ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेकडून दत्तात्रय वारे यांना निलंबित करण्यात आलय. शाळेच्या विकासासाठी गावकर्यांचा समावेश असलेली शाळा विकास समिती वाबळेवाडीत काम करते.  शाळेसाठी ही समिती ऐच्छिक स्वरुपात देण्यात येणाऱ्या देणग्या स्वीकारते.  देणग्या स्विकारतना त्याचा व्यवस्थित हिशोब ठेवला नसल्याच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं.  त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दत्तात्रय वारे यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आलाय.  


फक्त 34 पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील संख्या 9 वर्षात दत्तात्रय वारे यांनी 531 पर्यंत पोहचवली होती. या शाळेसाठी गावकऱ्यांनी कोट्यवधींच्या जमिनीही दिल्या. वाबळेवाडीमधील या शाळेतील उपक्रम प्रेरणादायी आहेत. इथं आठ वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जातात. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी सहावीपासून केली जाते. भविष्यातील व्यवसाय कोणते असतील याचा परिचय, कोडिंग व प्रोग्रामिंग , इंग्रजी संभाषण असे कितीतरी उपक्रम या शाळेत रावबले जातात. आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षण प्रेमींनी या शाळेला भेट दिली आहे. या शाळेतील विविध भाषा शिक्षणाचे उपक्रम हे अनुकरणीय असून अनेक शाळा त्यांच्या प्रभावातून काम करत आहेत. या शाळेतील दत्तात्रय वारे यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचे कौतुक केले आहे. पण याच दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने निलंबित केले आहे.


स्थानिक राजकारणामुळे दत्तात्रय वारे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. दत्तात्रय वारे सकाळपासून रात्रीपर्यंत शाळेत थांबत होते. पण कामात अनियमितता असा आरोप ठेवून त्यांचं निलंबित केल्याचं नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर म्हटेलय. गावकऱ्यांनी लाखो रुपये जमा केले, काही कंपन्यांकडून निधी मिळवला, त्याचा हिशोब गावकऱ्यांनी ठेवला. मुख्याध्यापकांचा काहीच संबंध नाही परंतु ओढून-ताणून त्यांना या आर्थिक व्यवहारात जबाबदार धरून निलंबित केल्याचं काही स्थानिकांनी म्हटलेय. 


एकीकडे सरकार, सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत म्हणून सातत्याने बोलत असते. अशा वेळी जिल्हा परिषदेची शाळा किती प्रभावी होऊ शकते ? खाजगी शाळेलाही मागे टाकत आंतरराष्ट्रीय दर्जा निर्माण करू शकते. अशा शाळेचे मॉडेल कौतुकाने मिरवण्यापेक्षा या शाळेवर आरोप करून ग्रामस्थांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आलं. या सर्व प्रकरणावर शिक्षण विभागाने मौन बाळगलं आहे.