BJP MLA Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस बजावली. एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नितेश राणे यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. तक्रारदाराने आपल्या तक्रारीत राणे यांचे नाव घेतले होते. 


कणकवली येथील संतोष परब यांनी ही तक्रार नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वी परब हे आपल्या दुचाकीवरून कणकवलीतील नरवडेनाका ते कनेडीकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला नंबरप्लेट नसलेल्या इनोव्हा कारने धडक दिली. संतोष परब पडल्यानंतर वाहनातील अज्ञात व्यक्तीने तू संतीश सावंत यांचे काम करतोस का, बघतो तुला अशी धमकी देत चाकूने छातीवर वार करत हत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोराने गोट्या सावंत आणि नितेश राणे यांना कळवले पाहिजे असे म्हणत इनोव्हा कारमध्ये बसून पळून गेला. कणकवली पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने आमदार नितेश राणे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 


आमदार नितेश राणे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. कोकणातील शिवसेनेत सध्या अंतर्गत वाद सुरू आहेत. त्यातून लक्ष हटवण्यासाठी माझे नाव गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून वकिलांनी पोलीस ठाण्यात माझ्यावतीने बाजू मांडली असल्याचे त्यांनी सांगितले. 


दरम्यान, नितेश राणे यांनी मुंबईतील वीर जिजामाता प्राणीसंग्रहालयाचे नाव बदलण्यात आल्याचे ट्वीट केले होते. या ट्वीट प्रकरणी मुंबईतील शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवसैनिकांच्या तक्रारीकडे आपण फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचा टोला ही राणे यांनी लगावला.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha