Muslim Reservation Issue in Maharashtra  Assembly Session : राज्यात मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरून विधानसभेत बॅनरबाजी करण्यात आली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख यांनी सभागृहात बॅनर झळकावले. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. 


समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी म्हटले की, मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याबाबत कोर्टाने मंजुरी दिली आहे. मागील सरकारने मुस्लिम आरक्षण दिले नाही. तर, आमचं सरकार आरक्षण देईल असे सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी त्यावेळी सांगितले होते अशी आठवणही अबू आझमी यांनी करून दिली. त्यामुळे आता मुस्लिम समाजाला न्याय कधी मिळणार असा प्रश्नही आझमी यांनी उपस्थित केला. 


यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले की, आरक्षणावर 50 टक्क्यांची सीमा आहे. केंद्र सरकारनेही मर्यादा वाढवावी अशी आमची मागणी आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला तर मराठा आरक्षण व इतर आरक्षणही मिळेल असेही त्यांनी सांगितले. 


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांनी म्हटले की, लहानपणी आम्ही गोष्ट ऐकायचो की राज्याचा पोपट मेला पण सांगायचं कोणी. आता नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. धर्माच्या नावावर आरक्षणाला आमचा विरोध असून ही आमची आधीपासून भूमिका असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.  नवाब मलिक यांनी पलटवार करताना फडणवीस सरकारने आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाजाला धोका दिला असल्याचे म्हटले. 


तरीही सरकारला पाठिंबा 


50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण देत येत नाही असे आता नवाब मलिक म्हणत आहेत. मात्र, याआधी आरक्षणाबाबतचा अध्यादेश आणताना हे माहीत नव्हते का, असा सवाल समाजवादी पक्षाचे आमदार नवाब मलिक यांनी उपस्थित केला. 5 टक्के आरक्षणाची घोषणा करून फक्त मते मागितली गेली. लोकांना मूर्ख बनवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सरकारमध्ये सामील झालो असून सरकारला पाठिंबा कायम राहणार असल्याचे आझमी यांनी सभागृहाबाहेर म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha