Mumbai School Reopen : मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार कमी होताच पहिली ते सातवीच्या शाळा काही निर्बंधांमध्ये सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र शाळा सुरु होताच, बहुतेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्यानं ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत शाळांना कडक शब्दांत सूचना दिल्या जात आहेत. त्यानंतरही ज्या शाळा ऑनलाईन शिक्षण देणार नाहीत, त्यांच्यावर राज्य सरकारच्या कायद्यानुसार, कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे. 


मुंबईमधील पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्यात आल्या आहेत. शाळा सुरु करताना मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत पाठवण्यास तयार नसतील त्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावं, असेही आदेश शिक्षण विभागानं सर्व शाळांना दिले आहेत. मात्र, 15 डिसेंबरपासून शाळा सुरु होताच, मुंबईमधील बहुतेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केलं आहे. यामुळे कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणू प्रसाराच्या भीतीनं जे विद्यार्थी शाळेत जाणार नाही त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. मुलांना शाळेत पाठवले तर विषाणूच्या संसर्गाची भीती आणि शाळेत नाही पाठवलं तर शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांमध्ये आहे. 


महापालिकेचे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या शाळा ऑनलाईन शिक्षण देत नाहीत, त्यांची तक्रार आल्यास त्यांच्यावर राज्य सरकारच्या नियमानुसार, कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. 


दरम्यान, राज्यात ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्राथमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला आहे. मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी 30 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार असल्याचं जाहीर केलं होतं. आठवड्याभरानंतर तडवी यांना पुन्हा शाळा सुरु होण्यासंदर्भात विचारणा केली असता, 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु करण्याच्या निर्णयात कोणताही बदल झालेला नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI