चोरी केली पोटासाठी, पण पैशाला हात लावला नाही, चंद्रपुरातील हॉटेलमधील प्रकार!
चंद्रपुरातील चार दिवसांचा जनता कर्फ्यूदरम्यान भुकेल्या आणि प्रामाणिक चोराचं कृत्य सीसीटीव्हीत कैद झालं. चोर हॉटेलमध्ये घुसला. आधी पोटभर खाल्लं, काही पदार्थ खिशात भरले. मात्र यावेळी गल्ल्यातील नोटांच्या बंडलला हातही लावता तिथून निघून गेला.
चंद्रपूर : कोरोना संकटाने गोरगरिबांचे खाण्याचे कसे वांदे केले याचा प्रत्यय आणून देणारी एक घटना चंद्रपुरात घडली. पैशाचे बंडल हाती लागले असतानाही चोराने ते जसेच्या तसे ठेवले आणि खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन निघून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून गरिबांच्या भुकेचा आणि प्रमाणिकतेचाही प्रत्यय आला.
चंद्रपूर-नागपूर महामार्गावर हॉटेल सचिन आहे. आजूबाजूला फारशी लोकवस्ती नसलेले पण अगदी हायवेवर असलेल्या या हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. चंद्रपुरात 10 तारखेपासून चार दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यावेळी दुकाने, हॉटेल्स, काम-धंदे सारं काही बंद होते. 10 सप्टेंबरच्या रात्री हा युवक हॉटेल सचिनमध्ये घुसला. भूक आणि तहानेने व्याकूळ झालेल्या या चोराने आधी फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढली आणि मनसोक्त पाणी प्यायला. ती बॉटल परत फ्रीजमध्ये ठेवली. त्यानंतर त्याने हाती जे लागेल ते खाल्ले, काही खिशात भरले. कदाचित तो घरच्या लोकांसाठी नेत असावा. नंतर कॅश काऊंटरचे कप्पे उघडून बघितले. त्यात त्याला मोठी रक्कम दिसली. मात्र ही रक्कम त्याने जशीच्यातशी ठेवली आणि निघून गेला.
लॉकडाऊन संपल्यानंतर हॉटेल मालकाने हे सीसीटीव्ही फुटेज पाहिले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्यांनी लगेच पैसे तपासले, ते तसेच ठेवलेले दिसले. केवळ भुकेपोटी या युवकाने हे कृत्य केले, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलीस तक्रारही केली नाही.