पर्यटकांसाठी खुशखबर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुला
मागील साडेतीन महिन्यांपासून बंद असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. मात्र ताडोबात जंगल भ्रमंती करताना पर्यटकांना कोविड विषयक काळजी घेणे बंधनकारक असणार आहे.
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील साडेतीन महिन्यांपासून बंद असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून (1 जुलै) पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. मात्र ताडोबात जंगल भ्रमंती करताना पर्यटकांना कोविड विषयक काळजी घेणे बंधनकारक असणार आहे. आज सकाळी बफरमधील गेटवर पर्यटकांचे थर्मल टेस्टिंग करण्यात आलं आणि पर्यटकांच्या जिप्सी सॅनिटाईज करण्यात आल्या. कोरोनामुळे 18 मार्चपासून ताडोबातील पर्यटन बंद होतं.
नियम आणि अटी कोणत्या? 1) पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना स्वतःचा मास्क, सॅनिटायझर वापरावे लागेल 2) प्रत्येक प्रवेशद्वारावर डिजिटल थर्मामीटरद्वारे पर्यटकांची तपासणी केली जाणार 3) पर्यटकांना तापाची लक्षणे दिसल्यास त्या पर्यटकास टायगर सफारीपासून रोखले जाणार
यासह कोविड प्रतिबंधासाठी असलेल्या अन्य अटी आणि शर्तीवर ताडोबातील बफर झोन पर्यटनासाठी सुरु करण्यात आले आहे. बफर क्षेत्रातील 13 प्रवेशद्वारातून पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. प्रत्येक गेटमधून सकाळी आणि दुपारी सोडणार प्रत्येकी सहा जिप्सी सोडल्या जातील. पर्यटकांसाठी ऑनलाईन बुकिंग बंद असून थेट प्रवेशद्वारातून तिकीट दिलं जाणार आहे.
ऐन हंगामात ताडोबा व्याघ्र प्रकल्प साडेतीन महिन्यांपासून बंद असल्याने पर्यटनावर आधारित हजारो लोकांचा रोजगार बुडाला आहे. जवळपास तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झालं आहे. रोजगार बुडाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे तातडीने ताडोबा प्रकल्प सुरु करण्याची मागणी इथल्या 'होम स्टे असोसिएशन'ने मुख्यमंत्र्यांना केली होती. आता प्रकल्प सुरु झाल्यामुळे ताडोबा प्रकल्पावर अवलंबून असलेले जिप्सी चालक, गाईड्स आणि इतर व्यवसायिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
चंद्रपूरमधील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी ओळखला जातो. व्याघ्र प्रेमींची पर्यटनासाठीची पहिली पसंती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा असते. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात 115 वाघ आणि 151 बिबटे असल्याचा प्राथमिक अंदाज महाराष्ट्र वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थेने संयुक्तपणे जाहीर केलेल्या अहवालातून व्यक्त करण्यात आलेला आहे.