पंढरपूर : चंद्रकांत पाटील कार्तिकी एकादशीची महापूजा करणार, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा विरोध
कार्तिकी एकादशीची महापूजा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे.
पंढरपूर : राज्यातील शिवसेना - भाजपमधील वादाचे पडसाद आता राज्यभर दिसू लागले आहेत. यात चक्क पंढरपूरच्या विठुरायालाही वेठीस धरण्याचे काम सुरु झाले आहे. कार्तिकी एकादशीची महापूजा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यास शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे आता नवा वाद होणार, अशी चिन्हं दिसत आहेत.
यंदाची कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने तसे मंदिर समितीला कळविले. मात्र सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपमधील वादाच्या पार्श्वभूमीवर ही पूजा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करु नये, अशा प्रकारची पत्रकबाजी पंढरपूरमधील शिवसेना तालुका संघटक संदीप केंदळे यानी सुरु केली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे.
या पत्रकबाजीनंतर संभाजी ब्रिगेडने यंदाची महापूजा राज्यपाल महोदयांच्या हस्ते करावी अन्यथा वारकऱ्याच्या हस्ते करण्याची मागणी केली आहे. आज कार्तिकी नवमी आहे. वारकरी संप्रदायाचा कार्तिकी एकादशीचा महाउत्सव अवघ्या दोन दिवसांवर आहे. अशा वेळी वाद निर्माण करून शिवसेना उत्सवाला गालबोट लावत असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे.
वास्तविक महापूजा कोणी करायची हा सरकारचा निर्णय असतो. सध्या काळजीवाहू सरकार असल्याने विधी व न्याय विभागाने ही महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी करण्याचे आदेश मंदिर समितीला दिले आहेत.
आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री अथवा मंत्रीमंडळातील दुसऱ्या क्रमांकाच्या मंत्र्याच्या हस्ते करण्यात येते. ही प्रथा युतीच्या 1995 मधील सरकारकडून सुरु करण्यात आली आहे.