परभणीच्या गंगाखेड मधील डोंगरजवळ्यात गांजाची शेती, 8 लाखांची गांजाची झाडे जप्त
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या ठिकाणी कारवाई करून दोन जणांना ताब्यात घेऊन तब्बल 8 लाख 60 हजार रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत.
![परभणीच्या गंगाखेड मधील डोंगरजवळ्यात गांजाची शेती, 8 लाखांची गांजाची झाडे जप्त Cannabis cultivation near hills in Parbhani's Gangakhed 8 lakh cannabis plants seized परभणीच्या गंगाखेड मधील डोंगरजवळ्यात गांजाची शेती, 8 लाखांची गांजाची झाडे जप्त](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/08050835/WhatsApp-Image-2020-11-07-at-10.53.19-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
परभणी : मागच्या अनेक दिवसांपासून मराठवाड्यात अनेक ठिकाणी गांजाची शेती करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहेत. परळी, हिंगोली पाठोपाठ आता परभणीत ही कारवाई करण्यात आली आहे. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील डोंगरजवळ्यात कापुस आणि तुरीच्या अंतरपिकात गांजाची शेती केली जात होती ज्याची माहिती पोलिसांना लागताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या ठिकाणी कारवाई करून दोन जणांना ताब्यात घेऊन तब्बल 8 लाख 60 हजार रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत.
परभणी जिल्ह्यातील पिंपळदरी शिवार हा डोंगराळ भाग असून अतिशय विस्तीर्ण पसरलेला आहे. या भागात अनेक दिवसांपासून गांजाची विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्यांना मिळाली यावरून त्यांनी या परिसरात कारवाई केली आहे. या पथकाने पाहणी केली तेंव्हा पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरजवळ्यातील गट क्र. 64 व 65 मध्ये नाथराव देवराव मुंडे यांनी त्यांच्या शेतातील कापूस व तुरीत अंतरपीक म्हणून जागोजागी हिरवीगार बोंडे आलेली उग्रट वासाची झाडे म्हणजेच गांजाची लागवड केल्याची स्पष्ट झाले. कापूस व तुरीच्या पिकात गांजाची झाडे लपून घेतली असल्याचे ही दिसून आले. गट नं.64 मध्ये एकूण 25 हिरवी व तीन वाळलेली झाडे आढळून आली. शिवाय या शेताच्या पश्चिमेस गट नं. 65 मध्येही कापूस व तुरीच्या पिकात 21 हिरवी व पाच वाळलेली झाडे असल्याचे दिसले.ही सर्वच गांज्याची झाडे पथकाने जप्त केली.
यात अंदाजे दोन लाख 80 हजार रुपयांची अंदाजे 600 ग्रॅम वजनाची, गांजाची बोंडे आलेली उग्रट वासाची हिरवारी झाडे, अंदाजे चार लाख रुपयांची 21 हिरवीगार बोंडे असलेलीी उग्रट वासाची गांजाची झाडे व्यापाराच्या उद्देशाने लागवड केलेली अंदाजे वजन 80 किलो,19 हजार रुपयांची अंदाजे एक किलो 900 ग्रॅम वजनाचे पाच वाळून गेलेली झाडे, असा एकूण सात लाख 50 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याचबरोबर त्या शेताच्या बाजूस असलेल्या शेतात दगडीराम देवराव यांच्याही शेताची पाहणी केली असता तेथेही कापूस व तुरीच्या झाडामध्ये गांज्याची शेती घेत असल्याचे दिसून आले. तेथे गांज्याची 35 झाडे उग्रट वासाची हिरवीगार व्यापाराच्या उद्देशाने लागवड केलेली पथकास आढळली. एक लाख 55 हजार रुपये अंदाजे किंमतीची एक किली ग्रॅम वजनाची झाडे अशी एकूण तब्बल 8 लाख 60 हजार रुपयांची गांज्याची झाडे जप्त केली आहेत.
दरम्यान डोंगरजवळ्यातील नाथराव देवराव मुंडे व दगडीराम देवराव मुंडे या दोघांनी गांजाची शेती केल्या प्रकरणी दोघांविरूध्द एनडीपीएस ऍक्ट 1985 चे कलम 20 (अ) (ब)(1) 22 अन्वये पिंपळदरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी हे करीत आहेत.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)