(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बदनाम झालेल्या महसूल खात्यात पारदर्शकता आणणार; राधाकृष्ण विखे पाटलांचा माजी महसूल मंत्र्यांना टोला
Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर, राष्ट्रवादीकडील खाती फडणवीसांच्या हाती, तर शिंदे गटाकडे मविआ सरकारमधील शिवसेना आणि काँग्रेसची खाती
Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळ विस्तारानंतर काल (रविवारी) अखेर खाते वाटप झालं आणि राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना महसूल पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर आनंदाचं वातावरण निर्माण झाले असून पुत्र खासदार सुजय विखे (Sujay Vikhe-Patil) यांनी भाजपनं दिलेल्या मानाचा पेढा असं वक्तव्य करत वडिलांना पेढा भरवला. कोल्हार येथील देवीच्या दर्शनानंतर सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी दोघांनीही भाजपनं दिलेल्या आदराबाबत आभार व्यक्त केले. तसेच, महसूल खातं बदनाम झालं होतं, त्यामुळे आता अभ्यास करून खात्यात पारदर्शकता आणणार असल्याचं वक्तव्य करत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
माझ्यासाठी हा सुखद धक्का : राधाकृष्ण विखे पाटील
नवनिर्वाचित महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलताना म्हटलं की, "माझ्यासाठी हा सुखद धक्का होता. पक्षाच्या प्रति निष्ठा आणि काम करण्याची तयारी असेल तर संधी मिळते आणि त्याच भूमिकेमुळे मला मोठी संधी काम मिळाली आहे. या संधीबद्दल पक्षाच्या सर्वांचे आभार." पुढे बोलताना ते म्हणाले की, "महसूल खात्याचा अभ्यास आधी करावा लागेल. खातं पूर्वीपासून बदनाम झालेलं होतं, या खात्यात प्रथम पारदर्शकता आणताना लोकाभिमुख कारभार करण्याचं मोठं आव्हान आहे आणि ते मला करायचं आहे."
"लोकांना हे सरकार आपलं वाटलं पाहिजे. ही जबाबदारी सांभाळताना मागच्या लोकांनी काय केलं? याची चर्चा करायची नाही. मात्र मागील काळात जे काही चुकीचं घडलं असेल त्याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाईसुद्धा होईल. मात्र त्यात महत्वाचा वेळ घालवण्यापेक्षा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर दिला जाईल.", असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
खातं नव्हे तर मानसन्मान महत्वाचा : सुजय विखे
राधाकृष्ण विखे पाटलांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर सुजय विखेंनी भाजपचे आभार मानले. त्यावेळी ते म्हणाले की, "मी जेव्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच समाधान होतं. पण ज्या कार्यकर्त्यांना शंका होत्या, त्यांचं आता समाधान झालं असेलच. हे प्रेम आणि न्याय भाजपनं आम्हाला दिलंय. खातं नव्हे तर मानसन्मान महत्वाचा आणि तो आम्हाला मिळाला यासाठी भाजपचे आभार."